पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी रुपयांची विकासकामे सुरू असताना, दुसरीकडे नाशिककरांना खड्डे, चिखल, रस्ते खचणे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह सातपूर आणि अंंबड औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडले असून, काही भागांत रस्ते अक्षरशः खचल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून, वाहनचालकांचा प्रत्येक प्रवास जीवघेणा ठरत आहे.
नाशिक-त्र्यंबक रस्ता, मुंबई-आग्रा महामार्ग, गंगापूर रोड, मुंबई नाका परिसर, कॉलेज रोड, निमाणी बसस्थानक परिसर, मखमलाबाद रोड, हनुमानवाडी, शेरी मळा, तपोवन रोड, कुंभारवाडा, गोदावरी पूल, तपोवन कॉर्नर तसेच गोदावरी पूल-अमरधाम रोड या प्रमुख मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होत आहेत. काही ठिकाणी महापालिकेकडून खड्डे बुजविण्यासाठी माती टाकण्याचा अजब प्रकार घडत आहेत. मात्र, पावसात ही माती चिखलात रूपांतरीत झाल्याने परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र आहे. शहरातील विविध विकासकामे, जलवाहिन्या, मलनिस्सारण आणि इतर कामांसाठी अनेक रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एका मार्गावर दुहेरी वाहतूक सुरू असून, सतत वाहतूक कोंडी होत आहे. कार्यालयीन वेळा, शाळा आणि बाजारपेठ परिसरात नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागत आहे.
दुसरीकडे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांचीही अवस्था गंभीर आहे. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते खचले आहेत. काही भागांत डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्यांवर पाणी साचत असल्याने मालवाहतूक करणार्या वाहनांना मोठा फटका बसत आहे. उद्योगांना कच्चा माल आणि तयार मालाची वाहतूक करताना विलंब होत असून, वाहनांच्या देखभाल खर्चातही वाढ झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेचा थेट परिणाम अपघातांवर होत आहे. खड्डे, चिखल आणि निसरड्या रस्त्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. अशा वेळी शहरातील प्रमुख रस्त्यांची आणि औद्योगिक वसाहतींची दुरवस्था कुंभापर्यंत तरी ठीक होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तात्पुरत्या उपायांऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांची उभारणी, खोदकामानंतर तातडीने पुनर्बांधणी आणि खचलेल्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक, उद्योजक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
सर्व खड्डे तातडीने डांबराने बुजवावेत
खचलेल्या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती
माती टाकण्याची पद्धत बंद करावी
खोदकामानंतर त्वरित पुनर्बांधणी
धोकादायक ठिकाणी इशारा फलक व लाईट लावावेत
कामांचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
रस्त्यांची प्रमुख समस्या
♦ मोठमोठे खड्डे
♦ रस्ते खचण्याचे प्रकार
♦ चिखलाचे साम्राज्य
♦ पावसाचे पाणी साचणे
♦ खोदकामानंतर रस्ते पूर्ववत नाहीत
♦ निकृष्ट दर्जाची तात्पुरती दुरुस्ती
सध्या नाशिकमध्ये सर्वत्र रस्त्यांचे काम चालू आहे. त्यामध्ये वाहतुकीचे गंभीर प्रश्न निर्माण होत असून, वारंवार अपघात होऊन त्यामध्ये बर्याच नागरिकांचा मृत्यू पण झालेला आहे. या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी नियोजनाचा अभाव व प्रशासनाने या गोष्टींना गंभीर घेण्याची गरज आहे. औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. त्याबद्दल पण महानगरपालिकेने कमीत कमी ते रस्ते खड्डे भरून जाण्या-येण्यायोग्य करून घेणे गरजेचे आहे.
– राजेंद्र पानसरे, अध्यक्ष, आयमा
काम कमी, रील्स जास्त!
शहरातील नागरिक खड्ड्यांमुळे मेटाकुटीला आले आहेत. आतापर्यंत पाच जणांचा या खड्ड्यांत बळी गेला आहे. खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जात असले तरी रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर चमकोगिरी सुरू आहे. नागरिकदेखील या चमकोगिरीला कमेंटसच्या माध्यमातून टीकाटिप्पणी करत संबंधितांना ट्रोल करीत आहेत. शहरातील एकही रस्ता चालण्यायोग्य राहिलेला नाही. त्यात खड्डे बुजविताना टाकण्यात येणार्या मातीमुळे रस्त्यावर आणखी चिखल होत आहे. त्यातून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. सध्या पर्यटनाला बहर यावा अशा पद्धतीने खड्डे पाहणीचा कार्यक्रम सुरू आहे. खड्डे पाहतानाचे रील्स तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे नागरिक आणखी ट्रोल करीत असल्याचे चित्र सोशल मीडियावर पाहावयास मिळत आहेत.
वाढते अपघात
रस्ते अपघातांत नाशिक शहरात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. अनेक मार्गांवर व रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहने घसरून अनेक अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने व पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज न आल्यानेदेखील अनेक अपघात घडत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
औद्योगिक वसाहतींना मोठा फटका
शहरातील औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली असून, या रस्त्यांवर जड वाहनांची वर्दळ अधिक असल्याने रस्त्यांचे खड्ड्यांत रूपांतर झाले आहे. परिणामी, उत्पादन व पुरवठ्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे उद्योजक चांगलेच संतप्त झाले आहेत.
वाहन दुरुस्तीच्या खर्चात वाढ
अपघातात वाढ, वाहतूक कोंडी, वेळेचा अपवय, इंधन खर्चात वाढ झाली आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने वाहनांचे स्पेअरपार्ट खिळखिळे होत आहेत. परिणामी, सातत्याने वाहनांची सर्व्हिसिंग करावी लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मणक्यांच्या आजारांत वाढ
खडड्यांमुळे वाहनधारकांना आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवताना दिसत आहेत. सततच्या खड्ड्यांतून वाहने चालवण्यामुळे मणक्यांच्या आजारांत वाढ झाली आहे, असे आरोग्यतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहेत. कंबरेला, पाठीला, मानेला खड्ड्यांमुळे झटका लागून दुखापत होत आहे.
तासन्तास वाहतूक कोंडी
शहरातील अनेक मार्गांवर तासन्तास वाहतूक कोंडी होणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सातपूर मार्गावर तर सकाळ व सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. तसेच मुंबई-आग्रा महामार्ग, गंगापूर रोडवरदेखील मोठी वाहतूक कोंडी होत असते. नागरिक रस्त्यांच्या सर्व समस्यांमुळे प्रंचड वैतागल्याचे चित्र आहे.
Deadly Potholes!