अडीच हजार खड्डे बुजवले

मनपाचा दावा; मिलिंग मटेरियलचा वापर

नाशिक : प्रतिनिधी
पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असून नागरिकांना त्याचा त्रास कमी व्हावा यासाठी महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीची मोहीम अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी शहरभर युद्धपातळीवर काम करत जून महिन्यापासून आतापर्यंत तब्बल 11 हजार 609 खड्डे बुजविले. तर 30 जुलै ते 2 ऑगस्ट या चार दिवसांत 2 हजार 568 खड्ड्यांची दुरुस्ती केल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे.
महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व सहा विभागांमध्ये दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. मुख्य रस्ते, वाहतुकीची जास्त वर्दळ असलेले मार्ग आणि नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारींना प्राधान्य देत विभागनिहाय पथके सातत्याने कार्यरत
आहेत.
पावसामुळे प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या स्थितीनुसार जीएसबी, मुरूम, कोल्डमिक्स तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या मिलिंग मटेरियलचा वापर केला जात आहे. विशेषतः मिलिंग मटेरियलच्या वापरामुळे पावसाळ्यातील खड्डे दुरुस्ती अधिक परिणामकारक होण्याची अपेक्षा असून, त्याचा वापर शहरातील विविध भागांत सुरू करण्यात आला आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असतानाही रस्ते दुरुस्तीची कामे अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या ठिकाणांना प्राधान्य दिले जात असून, हवामानानुसार आवश्यक त्या तांत्रिक उपाययोजनांचा वापर करून रस्ते सुरक्षित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान बुजवलेले खड्डे
विभाग        दुरुस्त खड्डे
सातपूर             869
पंचवटी             496
पश्चिम             354
नवीन नाशिक   314
नाशिक रोड       312
नाशिक पूर्व       223
एकूण           2,568

2,500 potholes filled

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *