मंत्री भुजबळ : राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त येवल्यात विणकर मेळावा
येवला : प्रतिनिधी
“विणकरांच्या सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा, शिक्षण आणि कल्याणाशी संबंधित प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. लोकल ते ग्लोबल या संकल्पनेनुसार येवला पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. पैठणी हा केवळ व्यवसाय नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा अभिमान आहे,” असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रीय विणकर दिनानिमित्त येवला शहरात महाराष्ट्र वस्त्रोद्योग समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, अमृता पवार, राधाकिसन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर व विणकर बांधव उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विणकरांच्या कलेची दखल घेत 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हॅण्डलूम डे म्हणून घोषित केला. 2004 मध्ये येवल्यात पैठणीची फक्त 3 दुकाने होती, तर आज 400 हून अधिक दुकाने सुरू आहेत. 30 गावांमध्ये 12 हजारांहून अधिक विणकर काम करत आहेत.”
महायुती सरकारने विणकरांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले असून, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली आहे. वस्त्रोद्योग धोरणांतर्गत पुरुष विणकरांना 10 हजार, तर महिला विणकरांना 15 हजार रुपये उत्सव भत्ता दिला जात आहे. 200 युनिटपर्यंत वीज मोफत, तर रेशीम खरेदीवर राज्य व केंद्राकडून मिळून 30 टक्के सवलत दिली जात आहे. तसेच विणकरांना ओळखपत्रे देऊन वर्कशेड व हातमागावर अनुदान दिले जात आहे.
नवीन पिढीने हा पारंपरिक व्यवसाय स्वीकारावा यासाठी आधुनिक प्रशिक्षण, तंत्रज्ञान, डिझाइन आणि ई-कॉमर्सच्या संधी उपलब्ध करून देण्यास शासन प्रयत्नशील आहे. येवला पैठणीचा जागतिक स्तरावर अधिक प्रचार-प्रसार व्हावा, असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
We will secure a global market for Paithani.