भगूरचे नगरसेवक अजय वाहने सहा वर्षांसाठी अपात्र

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकार्‍यांची कारवाई

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 10(अ) मधून अनुसूचित जाती आरक्षित जागेवर निवडून आलेले नगरसेवक अजय हरिश्चंद्र वाहने यांना नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करण्यात आले असून, पुढील सहा वर्षे नगरपरिषद निवडणूक लढविण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
भगूर नगरपरिषदेच्या 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीत वाहने यांनी अनुसूचित जाती आरक्षित जागेवरून निवडणूक लढवली होती. निवडणूक नियमांनुसार निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर करणे आवश्यक असते. मात्र, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वाहने यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले. या निर्णयामुळे भगूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 10(अ) मधील अनुसूचित जाती आरक्षित जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेसाठी लवकरच पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

पडताळणी समितीच्या निर्णयावरून कारवाई

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय तसेच भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी सादर केलेला चौकशी अहवाल विचारात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 16 तसेच कलम 16(1-ब)(अ) अंतर्गत विहित मुदतीत वैध जात प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर झाल्याने वाहने यांना अपात्र ठरविण्यात आले.

Bhagur Councilor Ajay Vahane disqualified for six years.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *