चहाची टपरी : गप्पांचे विद्यापीठ

– प्रशांत पोतदार
‘चल, एक चहा घेऊ’, हे चार शब्द केवळ चहासाठी नसतात तर ते मन मोकळं करण्याचं निमंत्रण असतं. आपल्या गावात, शहरात किंवा एखाद्या चौकात असलेली चहाची टपरी म्हणजे फक्त चहा विकण्याचं ठिकाण नसतं, तर ती समाजाला जोडणारा एक अदृश्य धागा असते. इथे उकळतो तो फक्त चहा नसतो, उकळतात कल्पना, नाती, अनुभव आणि आयुष्याला दिशा
देणारे विचार.
पूर्वी गावातील पारावर किंवा वडाच्या झाडाखाली जशा मैफली रंगायच्या, तशीच भूमिका आज अनेक ठिकाणी चहाच्या टपरीने घेतली आहे. मोबाइलच्या पडद्यामध्ये अडकलेल्या जगात अजूनही काही चेहरे प्रत्यक्ष भेटून हसतात, बोलतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात, हे या टपर्‍यांमुळेच. चहाच्या टपरीवर येणार्‍या माणसांची जात, धर्म, पद, पैसा किंवा प्रतिष्ठा याला काहीच किंमत नसते. इथे अधिकारी आणि शिपाई, शेतकरी आणि व्यापारी, विद्यार्थी आणि शिक्षक, श्रीमंत आणि गरीब सगळे एकाच बाकावर बसून एकाच ग्लासातला चहा पितात. समानतेचा असा सुंदर धडा कदाचित कोणत्याही विद्यापीठात शिकवला जात नसेल.
काही जणांना वाटतं, टपरीवर फक्त रिकामटेकड्या गप्पा होतात. पण वास्तव वेगळं आहे. इथल्या गप्पा हवेत विरून जाणार्‍या नसतात. अनेकांच्या अडचणींवर उपाय इथेच सापडतात. कोणाच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न असतो, कोणाला नोकरीची माहिती मिळते, कोणाला व्यवसायाची कल्पना सुचते, तर कोणाच्या मनावरील ताण दोन मित्रांच्या शब्दांनी हलका होतो.
अनेक वेळा मानसोपचारतज्ज्ञापेक्षा मित्राच्या काळजी करू नको, आपण आहोत ना! या एका वाक्याने माणूस पुन्हा उभा राहतो. हो, काही वेळा इथे अफवाही पसरतात, निरर्थक चर्चाही होतात. पण दोष टपरीचा नसतो, तो विचारांचा असतो. कारण जिथे माणसं असतात तिथे चांगलं-वाईट दोन्ही असणारच. महत्त्वाचं म्हणजे आपण त्या गप्पांतून काय उचलून घेतो.
आपल्या समाजात एक गंमत नेहमी दिसते. ज्याला स्वतःच्या घरात मुलगा दिवसभर काय करतो हे माहीत नसतं, तो चहाच्या टपरीवर बसून ‘सचिन तेंडुलकरने कोणता फटका मारायला हवा होता’, पंतप्रधानांनी काय बोलायला हवं होतं किंवा राज्यकर्त्यांनी कोणता निर्णय घ्यायला हवा होता यावर अत्यंत आत्मविश्वासाने भाष्य करत असतो. हे दृश्य पाहून हसूही येतं आणि विचारही करायला लावतो. कारण ही टीका नसते, ती आपल्या समाजाच्या मुक्त विचारांची एक वेगळी बाजू असते.
चहाची टपरी म्हणजे अनेकांसाठी तणावमुक्तीचं केंद्र असतं. दिवसभराचा कामाचा थकवा, कार्यालयातील ताण, शेतीची चिंता, घरातील जबाबदार्‍या हे सगळं काही काळासाठी तरी त्या गरम चहाच्या वाफेसोबत विरघळून जातात. म्हणूनच अनेक जण म्हणतात, चहा नाही, मित्रांना भेटायला जातो. या गप्पांमध्ये विनोद असतो, टोमणे असतात, पण त्याचबरोबर मायेची ऊबही असते. एखादा मित्र दोन दिवस दिसला नाही, तर ‘काय रे, तब्येत ठीक आहे ना’? असा प्रश्न विचारणारे लोक इथे भेटतात. ही चौकशी औपचारिक नसते तर ती मनापासून असते. म्हणूनच चहाची टपरी अनेकांसाठी दुसरं घर बनते. आज मोबाइलमुळे जग जवळ आलं, पण माणसं मात्र दूर गेली. सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण मन मोकळं करून ऐकून घेणारा एक मित्र शोधावा लागतो. चहाची टपरी ही ही उणीव भरून काढते. इथे ‘ऑनलाइन’ नव्हे, तर मनाने जोडलेली माणसं भेटतात. चेहर्‍यावरचं हसू खरं असतं आणि खांद्यावरचा हातही दिलासा
देणारा असतो.
अर्थात, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आवश्यक असते. कामधंदा सोडून दिवसभर टपरीवर बसणं योग्य नाही. पण कामाच्या धावपळीत थोडा वेळ काढून चार चांगले विचार ऐकणं, मित्रांच्या सुखदुःखात सहभागी होणं आणि समाजाशी जोडलेलं राहणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. कारण इथे फक्त वेळ जात नाही, अनुभव जमा होतात.शाळा माणसाला अक्षरओळख शिकवते, पण चहाचा कट्टा माणसाला माणूस ओळखायला शिकवतो. किंवा चहाचा पहिला घोट शरीराला तरतरी देतो, पण चहाच्या कट्ट्यावरच्या गप्पा मनाला जगण्याची नवी उमेद देतात. चहाच्या टपरीवरील गप्पा प्रेरणादायी असतील, विधायक असतील आणि कोणाची बदनामी किंवा वैर वाढवणार्‍या नसतील, तर त्यांचे सामाजिक मूल्य खूप मोठे आहे. पण वेळेचा अपव्यय, अफवा किंवा नकारात्मकता पसरवणार्‍या गप्पा हे आपल्या संस्कृतीचे खरे रूप नाही.
खरं तर प्रत्येक चहाची टपरी ही एक छोटंसं विद्यापीठच आहे. इथे प्रवेशासाठी अर्ज लागत नाही, फी लागत नाही, परीक्षा नसते आणि पदवीही मिळत नाही. पण इथून बाहेर पडताना माणूस थोडा अधिक समंजस, थोडा अधिक आनंदी आणि थोडा अधिक माणूस बनलेला असतो. म्हणूनच पुढच्या वेळी कोणी म्हणालं, चल, एक चहा घेऊ, तर त्याचा अर्थ फक्त चहा पिणं असा समजू नका. कदाचित त्या एका कपात मैत्रीची ऊब, जीवनाचा धडा, एखाद्या समस्येचं उत्तर आणि मनाला नवी ऊर्जा तुमची वाट पाहत असेल. म्हणूनच म्हणावंसं वाटतं की, चहाची टपरी ही फक्त टपरी नाही, ती खर्‍या अर्थाने गप्पांचं आणि माणुसकीचं विद्यापीठ आहे.

Tea Stall: A University of Conversations

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *