मुख्यमंत्री : भाजपातर्फे ‘तिरंगा रॅली’; मुख्यमंत्र्यांनी गायले देशभक्तीपर गीत
मुंबई : प्रतिनिधी
भारताच्या प्रगतीचा धसका घेतलेल्या काही परकीय शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्या तरी, भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून रोखण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असा खणखणीत इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईतील वरळी येथे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ’तिरंगा रॅली’ला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला.
वरळीत पार पडलेल्या या तिरंगा रॅलीला मुंबईकर आणि कार्यकर्त्यांचा अक्षरशः जनसागर लोटला होता. या देशभक्तीपर वातावरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः माईक हाती घेत ’दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे गीत गाऊन उपस्थितांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण केली. या भव्य रॅलीच्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सर्व प्रमुख नेते विशेषत्वाने उपस्थित होते.
नागरिकांचा ’तिरंगा महासागर’
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला अथांग सागर आणि दुसर्या बाजूला उसळलेला नागरिकांचा ’तिरंगा महासागर’ असे समर्पक वर्णन करत उपस्थितांची दाद मिळवली. आज भारत जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला असून, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अवकाश संशोधनात भारताने ऐतिहासिक झेप घेतली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश अशी ओळख निर्माण केलेल्या भारताची सर्वाधिक तरुण लोकसंख्या हीच खरी ऊर्जा असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
’ऐ वतन तेरे लिये’ मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल
भाषणापूर्वी ’दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिये’ हे प्रसिद्ध गाणे सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अचानक हातात माईक घेतला हे गाणे गाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचा हा अंदाज पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांना दाद दिली. त्यांच्या या गीतगायनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
No one will be able to stop India from becoming a superpower.