शेतकरी अन् दूधविक्रेत्याच्या वेशात रचला सापळा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा रोड भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी, दूधविक्रेता आणि मजुराची वेशभूषा करून रचलेल्या सापळ्यात तीन सराईत चोरटे रंगेहाथ जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या सूचनेनुसार गुन्हेगार व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी व घनदाट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरूण गाडेकर, रोहीत शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे हे हद्दीत गस्त घालत होते.
त्यावेळी गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील व पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, 20 ते 25 वयोगटातील तीन संशयित तरुण चोरीचा माल विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा, एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केट येथे येत आहेत. आरोपी अत्यंत चलाख असल्याने, चोरीचा मुद्देमाल सुरक्षित जप्त करणे आणि चोरट्यांना रंगेहाथ पकडणे हे पोलिसांपुढे आव्हान होते.
त्यामुळे पथकातील कर्मचार्यांनी तात्काळ शेतकरी, दूधविक्रेते आणि मजुरांची वेशभूषा करून भाजी मार्केट परिसरात गुप्तपणे सापळा रचला. रात्री 8 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून तीन संशयित आले. त्यांच्याजवळ टीव्ही आणि एसी दिसून आल्याने अन् त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, वेशभूषेत असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता चोहोबाजूंनी झेप घेत त्यांना ताब्यात घेतले. सोहिल नासीर कुरेशी (वय 20, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा गेट, सामनगाव), चेतन उत्तम तांबे (वय 20, रा. सिद्धार्थ नगर, नाशिकरोड), सूरज सोपान पवार (वय 20, रा. सिद्धार्थनगर, एकलहरा गेट, सामनगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी हा टीव्ही आणि एसी एकलहरे कॉलनीतून चोरल्याची अन् तो विकण्यासाठी आल्याची कबुली दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. संशयितांकडून एसी व कॉम्प्रेसर मशीन, एलजी 42 इंची टीव्ही, दोन मोटारसायकल असा एकूण 2,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास हवालदार भामरे आणि नाना पानसरे करत आहेत.
Three thieves arrested with stolen goods worth ₹2.80 lakh.