शहरात विनापरवाना तुपाचा 2.76 लाखांचा साठा जप्त

397 किलो तूप ताब्यात; नांदगावात 196 लिटर दूध नष्ट

नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष तपासणी मोहिमेत रविवार पेठ परिसरात विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेला विविध कंपन्यांच्या तुपाचा 2 लाख 75 हजार 812 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत 397.6 किलो तूप ताब्यात घेण्यात आले असून, तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेंतर्गत 10 ऑगस्ट रोजी रविवार पेठेतील संजय भागचंद बुरड यांच्या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न परवाना नसताना विविध कंपन्यांचे तूप विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. तसेच हे तूप निर्धारित गुणवत्तेच्या निकषांनुसार नसल्याचा संशय आल्याने केएमपी कृष्णा गायीचे तूप, माधुली गायीचे तूप आणि श्रीमयी गायीचे तूप या तीन प्रकारांचा एकूण 397.600 किलो साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित आस्थापना विनापरवाना अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळल्याने व्यवसाय तात्काळ बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
नाशिक शहरातील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा नवले आणि अक्षय खेडकर यांनी सहायक आयुक्त विनोद धवड आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली केली. नांदगावातील कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय गाडेकर, सुहास मंडलिक, गोविंदा गायकवाड, प्रतीक भड, अविनाश दाभाडे, सोनल पाडळे आणि श्रद्धा राहिंज यांनी सहायक आयुक्त दिनेश तांबोळी यांच्या
मार्गदर्शनाखाली केली.

अनकवाडे येथे तपासणी

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी सुरू आहे. 7 ऑगस्ट रोजी नांदगाव तालुक्यातील अनकवाडे येथील चंद्रकांत गरुड यांच्या दूध विक्रीच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित ठिकाणी विनानोंदणी व्यवसाय सुरू असल्याचे तसेच अस्वच्छ वातावरणात दूध साठवून ठेवल्याचे आढळले. दूध प्रथमदर्शनी विहित मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून गायीच्या दुधाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. उर्वरित 196 लिटर दूध नष्ट करण्यात आले.

Unlicensed ghee stock worth ₹2.76 lakh seized in the city.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *