खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी डागली तोफ

शहरात उद्योग कसे येणार? सरकारला सवाल

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने आणि सुरक्षित टप्प्यावर आणण्याची गरज आहे. नाशिकच्या विकासासाठी नागरिकांनीच प्रश्न विचारण्याची आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नाशिककरांनी 17 ऑगस्टच्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पैशांचा हिशेब सरकारला विचारावा. रस्त्यांची अवस्था पाहून नागरिकांमध्ये संताप असून, या सर्व प्रकाराला पालिका प्रशासन व सरकार असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे यांनी केली.
शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून ठाकरे सेनेने रान उठवले असून, गुरुवारी (दि. 13) आदित्य ठाकरे यांनी शहरात पाहणी दौरा केला. त्यानंतर महापालिकेत पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला. यावेळी ठाकरे म्हणाले, ज्या भागात आम्ही जाणार असल्याची माहिती मिळताच तेथे जेसीबीच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात आल्याचा आरोप केला. पेगलवाडी परिसरात जाणार असल्याचे समजताच रात्री रस्ता बुजविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे मान्य असले, तरी कामाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्याची पद्धत चुकीची आहे, असे ठाकरे म्हणाले. कामाच्या ठिकाणी फलक लावला जातो; मात्र या कामाचा नागरिकांना प्रत्यक्ष किती फायदा होणार, याचा विचार केला जातो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील काही भागांत काँक्रीटचे रस्ते आवश्यक आहेत, तर काही ठिकाणी डांबरी रस्ते करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात रस्ते खोदून ठेवण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. 17 ऑगस्टला खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी त्यांनी नाशिक दौरा करून सरकारला विविध प्रश्नांवर घेरले. गेल्या तीन वर्षांपासून नाशिकमध्ये येत असून, आजही परिस्थितीत कुठलाच फरक पडलेला नाही. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये उद्योग कसे येणार? असा सवाल त्यांनी केला. आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांवरूनही आदित्य ठाकरे यांनी सरकारला घेरले. गडचिरोलीमधून अशा घटना समोर येत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षितता का दिली जात नाही? असा सवाल त्यांनी केला.

Aditya Thackeray fired a cannon from the potholes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *