मंत्री गिरीश महाजन : स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या विकासासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्रयत्न करण्यात येत आहेत. सौर कृषी वाहिनी, शेतकरी कर्जमुक्ती, ‘वीर प्रेरणा स्थळ’, ‘शिव मार्ग’ व ‘राम मार्ग’च्या माध्यमातून नाशिकच्या विकासाचा रोडमॅप तयार झाला आहे. शेतकरी, युवक यांना पाठबळ देण्यासोबतच जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ उत्साहात झाला. यावेळी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात मंत्री श्री. महाजन यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करताना शेतकरी, महिला, युवक, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
या समारंभास आमदार सरोज आहिरे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन यांनी भाषणात नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर जिल्ह्यात होऊ घातलेल्या विकासकामांच्या संकल्पाची माहिती त्यांनी दिली. पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम व संजय वायचळे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर उपायुक्त भगीरथ देशमुख यांना राष्ट्रपती पदक, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अति उत्कृष सेवा पदक आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय, 100 मीटर धावणे परा अॅथलेटिक्स कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दिलीप महादू गावित यांचा सत्कार
त्यांनी केला.
सैन्यदलातील दिवंगत शिपाई संतोष डामसे यांच्या पत्नी वीर नारी उषा संतोष डामसे यांना रुपये तीन लाख रकमेचा धनादेश आणि फिजिकल कॅज्युलिटी आर्थिक मदत तर नायक दिवंगत सदाशिव अशोक म्हसकर यांच्या पत्नी वीर नारी नीता सदाशिव म्हसकर यांना रुपये दोन लाख रकमेचा धनादेश आणि फिजिकल कॅज्युलिटी आर्थिक मदत मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
’वीर प्रेरणा स्थळा’ची घोषणा; अभिनव भारत मंदिराचे लवकरच लोकार्पण
नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले ‘अभिनव भारत मंदिर’ नव्या स्वरूपात उभे राहत आहे. या ऐतिहासिक वास्तूचे लवकरच लोकार्पण होणार असून, येणार्या पिढ्यांना ती प्रेरणा देत राहील. युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी शहीद जवानांचे ‘वीर प्रेरणा स्थळ’ जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केली.
Will accelerate the pace of development for a ‘Developed Nashik’