मुंबई नाका आता स्वतंत्र वाहतूक युनिट

सिडको : प्रतिनिधी
द्वारका सर्कल भुयारी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक वडाळा व मुंबई नाका मार्गे शहरात येत आहे. त्यामुळे वडाळा नाका व मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी तसेच वाहतुकीचे योग्य नियमन करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई नाका येथे स्वतंत्र वाहतूक युनिट स्थापन करण्याचा आदेश 14 ऑगस्ट रोजी काढला. हे युनिट 15 ऑगस्टपासून कार्यरत
झाले आहे.
मुंबई नाका वाहतूक युनिटमध्ये एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, तीन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आणि 65 वाहतूक पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन शिफ्टमध्ये वाहतूक नियमनाचे काम केले जाणार
आहे.
या युनिटच्या प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत सहायक पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सरला पाटील, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार आणि पोलीस उपनिरीक्षक दिव्या बरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्वारका येथे स्वतंत्र वाहतूक युनिटची स्थापना करण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुंबई नाका येथे स्वतंत्र युनिट सुरू करण्यात आले आहे. या युनिटमुळे मुंबई नाका परिसरातील वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे होऊन वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.

Mumbai Naka is now a separate transport unit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *