शिवसेना ठाकरे गटाचा जनआक्रोश

सत्ताधार्‍यांच्या घरावर मोर्चे काढू : खा. राऊतांचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी
भाजपकडे एकहाती सत्ता असूनही शहरात ठोस असे काम होत नसल्याने नाशिककरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होत असून निष्पाप नागरिकांचा यात जीव जात आहे. रस्त्यांची परिस्थितीत अशीच राहिल्यास शिवसेना सत्ताधार्‍यांच्या घरांवर मोर्चे काढेल. असा इशारा शिवसेना ठाकरे सेनेचे खा. संजय राऊत यांनी दिला.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी (दि. 17) महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा राऊत यांनी पालकमंत्री तथा सिंहस्थमंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालिका प्रशासन भाजपवर चौफेर टीका केली. याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, जयंत दिंडे, वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी, निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनपा गटनेते केशव पोरजे, नगरसेविक योगेश गाडेकर, नगरसेविका भारती ताजनपुरे, सीमा ठाकरे, शैलेश ढगे, उप जिल्हाप्रमुख सचिन बांडे आदी उपस्थित होते. खा. राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाची सुरूवात शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयापासून झाली. पुढे खा. रातून म्हणाले, शहर परिसरातील रस्त्यांची स्थिती येत्या काळात न सुधारल्यास मनपातील सत्ताधार्‍यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचा इशारा ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांनी देत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टिकास्त्र सोडले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर आलेल्या मोर्चाचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. मोर्चा महापालिकेसमोर येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी गटनेते केशव पोरजे, खासदार वाजे आणि मिर्लेकर यांनी मार्गदर्शन केले. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या घटनांना जबाबदार कोण असा प्रश्न करत या घटनांची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

रामाची नगरी लूटण्याचे काम
– खा. राऊत
सिंहस्थाच्या कामांमध्ये कमिशन खाण्याचे काम सुरू असून, 35 हजार कोटी कुठे गेले असा प्रश्न करत सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी आपापल्या नातेवाईकांना सिंहस्थाची कामे दिल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा खा. राऊतांनी केला. सिंहस्थाच्या नावाखाली रामाची नगरी लुटण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.मोर्चाला संबोधीत करताना खा. संजय राऊत यांनी आमची शिवसेना ही रस्त्यावरची लढाई लढणारी असून, सत्तेमधील शिवसेना महापालिकेत बसणारी शिवसेना असल्याची टीका करत कुंभमेळा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शहराचा संपूर्ण विचका झाल्याचा आरोप केला.

रेडा व यमदुताने वेधले लक्ष
मोर्चामध्ये थेट रेड्याला उतरवल्याने हा चर्चेचा विषय ठरला. रेडयासोबतच यमदुताची वेशभूषा केलेला युवा सेनेचा विनय खैरनार ने लक्ष वेधले. दरम्यान रेड्यावर यमदूत असे लिहिण्यात आले होते. मोर्चास्थळी ही बाब लक्षवेधी ठरली. यावेळी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सात नाशिककरांचे छायाचित्र मोर्चाच्या ठिकाणी प्रसिध्द करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

तोवर शिवसेना शांत बसणार नाही
शहरातील नागरिकांना होणारा मनस्ताप पाहता शिवसेना शांत बसणार नाही. दररोज अपघात होत असून प्रशासनाकडून कुठेही कार्यवाही होत नसून फक्त आश्वासन दिले जात आहेत. त्यामुळेच खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाने आतातरी गांभीर्य दाखवावे व रस्ते दुरुस्ती होत नाहीत तोपर्यत आम्ही शांत बसणार नाहीत.
-केशव पोरजे, गटनेते, उबाठा

नाशिककरांची लूट सुरु
शहरात रस्त्यांची दुरावस्था होऊन अपघात होत आहेत. यात नागरिकांचा जीव जात आहे. मात्र प्रशासनाकडून नाशिककरांच्या पैशांची लूट सुरु आहे. प्रशासनाने येत्या काही दिवसांत रस्ते दुरुस्ती करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल.
– भारती ताजनपूरे, नगरसेविका

शिष्टमंडळाने घेतील आयुक्तांची भेट
खा. राऊत यांचे भाषण आटोपल्यावर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. शहर खड्डेमुक्त कशी करणार आणि दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न खा. वाजे व गटनेते पोरजे यांनी विचारला. त्यावर आयुक्तांनी सद्यस्थिती नमूद करत येत्या दोन महिन्यात शहरातील स्थिती सुधारेल, तसेच जे अपघात झालेत त्यासाठी चौकशी समिती नेमली असून दोषीवर कारवाई केली जाइल. असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सातपूर अंबड लिंक रोड आणि मखमलाबाद रोडचे काम गेल्या 15 ते 20 वर्षात झालेच नाही. आता ही कामे होत असून, रस्ता रूंदीकरणाच्या कामांमुळे त्यास विलंब होत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Public Outcry by the Shiv Sena (Thackeray Faction)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *