मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मनमाडला चौकशी समिती गठित
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड नगरपरिषदेमार्फत 1 व 2 जून 2026 रोजी शहरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईच्या चौकशीसाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. भाजप नेते व बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली आहे. नगरपरिषदेने मालेगाव चौफुली व इतर परिसरातील खासगी मालकीच्या मिळकतींवर तसेच दुकानदारांवर नियमबाह्यपणे कारवाई करून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप गोगड यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने तीन वेळा कारण दाखवा नोटीस बजावूनही नगरपरिषदेने खुलासा दिला नव्हता. त्यानंतर गोगड यांनी राज्याचे मुख्यमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. यापूर्वी शहरातील अतिक्रमण काढताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अमजद पठाण व राकेश ललवाणी यांनी सर्वसाधारण सभेत करून मोठे वादळ उभे केले होते. त्यानंतर 15 ऑगस्टनंतर उर्वरित अतिक्रमण काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिले होते.
सात दिवसांत अहवाल सादर करा
जिल्हा सहआयुक्त (नगरपरिषद प्रशासन) श्याम विठ्ठल गोसावी यांच्या देखरेखीखाली ही समिती काम करणार आहे. समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी करून 7 दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
अशी आहे चौकशी समिती
यशवंत पाटील (कार्यकारी अभियंता, नाशिक) – अध्यक्ष, निनाद जगताप (रचना सहाय्यक, सिन्नर) – सदस्य, मुकुंद शिंदे (लेखापरीक्षक, निफाड) – सदस्य, दुर्गेश गुजराथी (स्थापत्य अभियंता, नाशिक) – सदस्य सचिव.
Inquiry to be held into action against illegal encroachment.