नांदूरशिंगोटेत एमडी ड्रग्जचा पर्दाफाश

एकाला अटक; दुचाकी, मोबाइलसह 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-संगमनेर महामार्गावर नांदूरशिंगोटे येथील निमोण नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी 3.78 ग्रॅम वजनाचे सुमारे 22 हजार रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) जप्त केले. याप्रकरणी प्रदीप सोपान हेरोळे (35), रा. निंभोरा, ता. रावेर, जि. जळगाव; सध्या रा. अंबड, नाशिक याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी व मोबाइलसह सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नाशिक-संगमनेर महामार्गावरील हॉटेल प्रियालजवळ अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हेरोळेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता 22 हजार रुपये किमतीचे 3.78 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 40 हजार रुपये किमतीची बजाज सीटी 100 दुचाकी (एमएच 19-डीएच 4453) आणि विवो कंपनीचा मोबाइल असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांच्या चौकशीत हेरोळे याने निखिल गुंजाळ (रा. अंबड, नाशिक) याच्या सांगण्यावरून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे निखिल गुंजाळ याच्याविरुद्धही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक हेमंत फड, वावीचे सहाय्यक निरीक्षक आशिष शेळके, उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, उपनिरीक्षक छगन चव्हाण यांच्यासह हवालदार शहाजी शिंदे, राहुल निरगुडे, सचिन गवळी, पोलीस नाईक कैलास गोरे, पोलीस अंमलदार किरण पवार, रोशन गायकवाड, रोहित सानप, गणेश पवार, तुषार दयाळ आणि बालाजी कुंटेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहेत.

 

MD drug racket busted in Nandursingote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *