रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा पायी ‘मुंबई मोर्चा’ रोखला

इंदिरानगर पोलीस ठाण्यात ठिय्या; लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नाही

नाशिक / सिडको : प्रतिनिधी
प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित, तसेच जोपूळ-चिंचखेड हायवे क्रमांक 29 प्रकल्पामुळे होणार्‍या बाधित शेतकर्‍यांच्या वडिलोपार्जित जमिनी, घरे आणि संसार वाचविण्यासाठी नाशिक ते मुंबई असा पायी महामोर्चा छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. मात्र, इंदिरानगर परिसरात पोलिसांनी हा मोर्चा अडवून काही आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. रिंगरोडची अलाइनमेंट चुकीची असल्याचा आरोप करत चौकशीचा अहवाल येईपर्यंत जमीन मोजणी, खरेदी आणि अन्य प्रशासकीय कार्यवाही थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.
सकाळी दहाच्या सुमारास इंदिरानगर येथील गामणे मैदानावर शेतकरी आणि आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. मोर्चेकर्‍यांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर पोलिसांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे करण गायकर यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. रिंग रोडची अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या संदर्भातील चौकशीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनीची मोजणी, खरेदी किंवा अन्य प्रशासकीय प्रक्रिया राबवू नये, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच 25 टक्के मोबदला मिळण्याची भीती दाखवून शेतकर्‍यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा. प्रश्न सुटेपर्यंत रिंग रोडच्या कामासाठी कोणताही शेतकरी सहकार्य करणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
नाशिकहून मुंबईकडे जाणार्‍या पायी महामोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि मोर्चेकर्‍यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू झाली. संध्याकाळपर्यंत बैठक सुरू होती. मात्र, मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी कायम ठेवली.या महामोर्चात छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, राजू दिसले, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, दीपक हगवणे, सुदर्शन पाटील आणि गोकुळ बोराडे यांच्यासह सुमारे 500 ते 700 शेतकरी सहभागी झाले होते. महिला शेतकर्‍यांची उपस्थितीही लक्षणीय होती.यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महिला शेतकर्‍यांचे शुक्रवारी ‘राखी आंदोलन’

रिंग रोडबाधित महिला शेतकर्‍यांच्या वतीने 28 ऑगस्टला ‘राखी आंदोलन’ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन त्यांना राखी बांधत वडिलोपार्जित जमिनी, घरे आणि संसार वाचविण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘Mumbai March’ by farmers affected by the Ring Road project halted

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *