♦ चुंचाळे फाट्यावर दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू;
♦ मनपाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप,
♦ चिखलामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार
अंबड लिंक रोडवर आतापर्यंत अपघातांचे तीन बळी
♣ फारुख सलीम अत्तर (वय 19)- अंबड एमआयडीसी वेअर हाउसजवळ.
♣ प्रभाकर साहेबराव निकम (वय 49)- संजीवनगर, इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर.
♣ नीलेश कोतकर- एक्स्लो पॉइंट, प्रणय स्टॅम्पिंग कंपनीजवळ.
बोरसे कुटुंबीयांना मदतीची मागणी
सुनील बोरसे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि बहीण असा परिवार आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव महिरे यांचे मावसभाऊ असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे कुटुंबावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महापालिका प्रशासनाने बोरसे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बोरसे कुटुंबीयांना मदतीची मागणी
सुनील बोरसे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई आणि बहीण असा परिवार आहे. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी वैभव महिरे यांचे मावसभाऊ असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे कुटुंबावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महापालिका प्रशासनाने बोरसे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडको : प्रतिनिधी
शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खोदकामांनंतर निर्माण झालेले खड्डे आता नाशिककरांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसह एमएनजीएल आणि अन्य यंत्रणांच्या कामांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, त्यात पावसाने निर्माण झालेला चिखल आणि वाहतुकीची कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नाशिक महापालिका हद्दीत आतापर्यंत खड्ड्यांमुळे आठ जणांचा बळी गेल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. मंगळवारी (दि. 25) अंबड लिंक रोडवरील चुंचाळे फाट्यावर आणखी एकाचा जीव गेला. त्यामुळे आता आणखी किती बळी गेल्यावर महापालिका जागी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. चुंचाळे फाटा येथे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले सुनील दादाजी बोरसे (वय 54, रा. अशोकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 25) दुपारी एकच्या सुमारास मीना ट्रेडर्सजवळ ही दुर्घटना घडली.
ईश्वर उकरडू जगताप (वय 40, रा. श्रमिकनगर, सातपूर) हे एमएच 15-डीआर 2550 क्रमांकाच्या दुचाकीवरून सुनील बोरसे यांना मागे बसवून पपया नर्सरीकडून एक्स्लो पॉइंटच्या दिशेने जात होते. मीना ट्रेडर्सजवळ एमएच 14-ईएम 7977 क्रमांकाच्या ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील चिखल आणि मातीमुळे दुचाकी घसरली.
दुचाकी घसरल्याने दोघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी ट्रकची धडक बसल्याने सुनील बोरसे ट्रकच्या चाकाखाली आले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. ईश्वर जगताप जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील बोरसे व ईश्वर जगताप उत्कृष्ट चित्रकार होते. ते पोर्टेट बनविण्याचे काम करीत होते. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
रस्ता की मृत्यूचा सापळा?
अंबड लिंक रोडवर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना सुरक्षित मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या परिस्थितीत वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर जखमींना उपचारासाठी घेऊन जाणार्या रुग्णवाहिकेलाही खड्डे आणि संथ वाहतुकीचा फटका बसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यात अडथळा
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी विलंब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जीव वाचविण्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असताना रुग्णवाहिकेलाच खड्ड्यांतून आणि कोंडीतून वाट काढावी लागत असेल, तर रस्ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका प्रशासनाला नागरिकांचा सवाल
अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंक रोडवर यापूर्वीही अपघातांमध्ये जीवितहानी झाली आहे. मंगळवारच्या घटनेत सुनील बोरसे यांचा मृत्यू झाल्याने या मार्गावरील अपघाती मृत्यूंची संख्या चारवर पोहोचली आहे. एकाच मार्गावर वारंवार अपघात होऊनही रस्त्याची परिस्थिती सुधारत नसेल, तर प्रशासन आणखी किती मृत्यूची वाट पाहत आहे, असा सवाल नागरिकांनी केला आहे. विकासकामे आवश्यक असली तरी काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षित वाहतूक, योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेडिंग, चिखल व खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. मात्र, या मूलभूत उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
Potholes or death traps? Another victim.