सिडको : प्रतिनिधी
नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडकलेले नाशिकचे 200 यात्रेकरू सुखरूपपणे नाशिकमध्ये परतले. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या नियोजनामुळे सर्व यात्रेकरू सुरक्षित राहिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दत्त महाराजांच्या पादुकांसह तीर्थयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे 200 भाविक नेपाळ यात्रेला गेले होते. यात्रेदरम्यान नेपाळमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाली होती.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रस्टच्या सेवेकर्यांनी प्रसंगावधान राखत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे सर्व भाविक सुरक्षित राहिले.
यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती नाशिकमधील कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला. मंगळवारी, दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता सर्व 200 यात्रेकरू नाशिकमध्ये दाखल झाले.
मुंबई नाका येथे यात्रेकरूंचे स्वागत
यात्रेकरू नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर मुंबई नाका येथे ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. वाद्यांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत तसेच दत्तगुरूंच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाविकांनी जल्लोष केला. मुंबई नाका ते कालिका मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक कुटुंबीयांनी आपल्या आप्तस्वकीयांचे आनंदाने स्वागत केले.
200 pilgrims from Nashik stranded in Nepal have returned.