आज तिला हळद लागली, उद्या तिचं लग्न. सर्वजण आपापल्या कामात गुंतलेले. ती काही मैत्रिणी आणि बहीणभावांच्या घोळक्यात रमलेली. तो येता-जाता तिच्यावर नजर टाकतोय. तिचं हळदीचं पिवळं रूप बघून त्याला काही आठवतंय. तो सहजच बालपणात डोकावतोय, तिला किती राग यायचा पिवळ्या रंगाचा! चुकूनही फ्रॉकवर एखादं पिवळं फूल जरी दिसलं, तर फुगाटून तो फ्रॉक अगदी कपाटाच्या कोपर्यात ठेवायची. आज हळदीच्या रंगाने माखलेली जराही तक्रार करत नाहीये. उलट खळखळून झर्यासारखी हसतेय. रात्र बरीच झाली, पहाटे लवकर उठायचंय म्हणून कोणी साड्या नीट करतंय, तर कोणी मुलाकडच्या साठी मानपानाचं बघतंय. आई-बाबा बाहेर मंडपात काहीतरी बोलताहेत. एव्हाना सर्वजण आपापल्या कामात गुंतले. ती एकटीच हातावर काढलेल्या मेंदीत गुंतली; हिरवा चुडा, कंकण, बोटांनी कधी जवळ आणते, कधी दूर लोटते. इतक्यात तो तिच्या समोर येऊन बसतो. खिशातून एक छोटं चॉकलेट काढून तिच्या हातावर ठेवतो. ती गोड हसते आणि हसताहसता नकळत तिचे डोळे ओलावतात. इतका वेळ ती स्वतःला आवरून असते, पण त्याला बघितल्यावर तिचा बांध फुटतो आणि ओठांवर हसू फुलवत डोळ्यांच्या कडा जणू उंचावरून कोसळणार्या धारेने भिजून जातात. तिच्या डोळ्यातलं पाणी आता त्याच्या डोळ्यात आलंय, गालावर ओघळण्याआधीच तो थेंब डोळ्यातच साठवून ठेवतो. काही हवंय तुला? काही नको, तुझी कामं आटोपली असतील तर जरा वेळ बस इथे. तो बरं म्हणून जरा मांडी घालून स्थिरावतो.
काय मग, उद्या तू तुझ्या हक्काच्या घरी जाणार. आमची आठवण येईल का गं? त्याच्या बोलण्याने तिला आणखीच रडू येतं. कशीबशी सावरत, हसून ती त्याला सांगते, नाहीच येणार आठवण आणि तुझी तर अजिबात नाही! तुला आठवतंय, तुझ्यामुळे माझी कितीतरी वेळा शाळा बुडालेली? आई छान डबा करून द्यायची आणि आपण घर आणि शाळेच्या मध्ये असलेल्या त्या झाडाच्या पारावर बसून डबा फस्त करून वेळेत घरी परत येत होतो. माझे चालताना पाय दुखायचे, तर तू पाठीवर उचलून न्यायचास. एक दिवस शेजारचे काका त्याच वाटेने गेले आणि आपलं बिंग फुटलं. त्यांनी आईच्या कानावर घातलं-तुमची मुलं झाडाखाली डबा खातात, तिथेच खेळतात आणि परत येतात. मग तुझी चांगलीच धुलाई झाली! मी लहान, मला कळत नाही म्हणून वाचले, पण तू मोठा होतास, पाचवीत! त्या दिवसानंतर मग कधीच शाळा बुडवली नाही. मी लहान, बाबांची लाडकी. तुला काही लागलं-सवरलं, तर तुझ्या मागण्या माझ्या वाटेने बाबांपर्यंत जायच्या आणि मोबदल्यात नेहमीच तू लाच द्यायचास.
रोज सायंकाळी देवळाच्या भोवती आपण नुसतं भन्नाट खेळत होतो! एकदा आईस गोला खातांना तू रस संपलेला गोला परत त्या रंगीत पाकात बुडवला होता. तो गोलावाला भारी चिडलेला! शेवटी कसंबसं तिथून परत येऊन मावशीकडे आपण नुसतं त्या गोलावाल्यावर हसत होतो. किती मस्त होते ना ते दिवस! दिवाळीच्या फटाक्यासाठी किती भांडायची मी, तू तुझ्या वाटेचे मला देऊन टाकायचास.
दरवर्षी नेमाने येणारा रक्षाबंधनाचा सण-वर्षभर भांडण, किचकिच आणि या एकाच दिवशी कुठेकुठे जरा तुझ्या भाऊगिरीची धार कमी व्हायची! सकाळपासून सगळे सज्ज, आज घरी मामा लोक येणार आणि सगळी भावंडंपण. राखी बांधून घेतली की प्लॉटवर त्या रिकाम्या अर्धवट पडक्या घरात खेळायला सगळे मोकळे. मस्तच होते ते दिवस! तिची बडबड तो फक्त ऐकत नव्हता, तर त्याच हळव्या आठवणीने तोही गहिवरला होता.
चल, झोप आता, नाहीतर उद्या फ्रेश नाही वाटणार तुला! म्हणून त्याने तिला आठवणीतून परत आणले. बस रे जरा वेळ! म्हणत तिने त्याला गप्प केले. दोघे परत बराच वेळ ओलावलेल्या पापण्यांनी साठवणीतली एकएक आठवण गाठोड्यातून उकलू लागले.
खरं म्हणजे, कालपर्यंत छोट्याशा पेन-पेन्सिलवरून जमेनासे भांडणारे ते दोघे, आज मात्र एकमेकांची काळजी घेत होते… घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत होते. रात्रीचा निवांतपणा त्या दोघांच्या मनातील कातरतेने आणखीनच गडद केला होता.
तिने डोळ्यातले पाणी कसंबसं पुसत त्याच्या हातावर अलगद आपली मेंदी लागलेला हात ठेवला आणि म्हणाली, कितीही मोठी झाली आणि कितीही दूर गेले, तरी तुझ्यासाठी तीच लहान बहीण राहीन ना रे? त्याने तिचा तो हात आपल्या हातात घट्ट धरला, जणू बालपणात पाठीवर उचलताना हात धरलेला असतो तसाच! आणि तो फक्त हसला. त्या एका मूक स्पर्शामध्येच सार्या शब्दांचा अर्थ सामावला होता.
उद्यापासून नावं बदलतील, पत्ता बदलेल, घराचा उंबरठाही बदलेल, पण घरामागच्या त्या मातीच्या वाटेवर उमटलेल्या पाऊलखुणा कायम राहतील …
तुझं नि माझं जमेना,
तुझ्यावाचून करमेना..!
We don’t get along, yet I can’t bear to be without you!