298 पैकी अवघ्या 65 स्टॉलचीच विक्री
नाशिक : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवासाठी महापालिकेने शहरातील सहाही विभागांसाठी एकूण 298 गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उपलब्ध करून देत यासाठी दोनदा लिलाव प्रक्रिया राबवली. मात्र, या प्रक्रियेकडेे विक्रेत्यांनी सपशेल पाठ फिरवली आहे. तब्बल 233 स्टॉल्स शिल्लक आहेत. लिलाव प्रक्रियेत अवघ्या 65 स्टॉलला प्रतिसाद मिळाल्याने आता उर्वरित स्टॉलवर 10 टक्के दर लावून विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नाशिक पश्चिम, सातपूर विभागातील एकाही स्टॉलला प्रतिसाद मिळाला नाही. पंचवटी व नाशिक पूर्वमध्ये अवघ्या दोनच स्टॉलची विक्री होऊ शकली.
महापालिका दरवर्षी गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था करत असते. याकरिता प्रथम 25 ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी अवघ्या 60 विक्रेत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. त्यानंतर पुन्हा 27 ऑगस्ट रोजी लिलाव घेण्यात आला असता, तेव्हा अवघ्या पाचचा स्टॉलला बोली लागली. 14 सप्टेंबरपासून लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भाविकांकडून जय्यत तयारी केली जात आहे. घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेश आरास केली जाते. यासाठी मंडप, कमानी उभारण्यासह विविध परवानग्यांकरिता महापालिकेने आॉनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यासाठी विभागीय कार्यालयांच्या स्तरावर एक खिडकी योजना राबवली जात आहे. गणेशमूर्ती विक्रीसाठी महापालिकेतर्फे दरवर्षी स्टॉलच्या जागांचे लिलाव केले जात असतात. यंदाही सहाही विभागीय कार्यालयांच्या स्तरावर स्टॉलच्या जागांकरिता लिलाव करण्यात आले. यंदा सहाही विभागांत 298 गणेशमूर्ती स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक 105 स्टॉल्स नाशिकरोड विभागात उभारले जाणार आहेत. गणेशमूर्ती विक्री स्टॉल्सच्या लिलावात भाग घेणार्यांना प्रत्येक स्टॉलच्या जागेसाठी दहा हजार रुपये अनामत भरण्याची अट आहे.
विभागनिहाय स्टॉल्सची संख्या
विभाग स्टॉल्सची संख्या प्रतिसाद संख्या शिल्लक स्टॉल्स
नाशिक पूर्व 15 1 14
नाशिक पश्चिम 55 0 55
पंचवटी 58 2 56
सातपूर 19 0 19
नवीन नाशिक 46 12 34
नाशिकरोड 105 50 55
एकूण 298 65 233
गणेशमूर्ती विक्री स्टॉल्ससाठी दोनदा लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. यात शिल्लक राहिलेल्या स्टॉल्सवर 10 टक्के दर लावून त्यांची विक्री केली जाणार आहे.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त, मनपा
Vendors turn their backs on Ganesh idol stalls