आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रकल्प अधिकार्यांची उपस्थिती
सुरगाणा : प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे कळवण येथील आठवडा बाजारात भव्य पारंपरिक रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणार्या पौष्टिक रानभाज्यांचे महत्त्व पुन्हा लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कळवणच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा फवारणीचा वापर न करता उगवणार्या या रानभाज्या 100 टक्के सेंद्रिय व रोगप्रतिकारकशक्ती वाढवणार्या असतात. महोत्सवात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले व उपस्थितांना त्यांच्या गुणधर्मांची माहिती दिली. आठवडा बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी रानभाज्यांच्या औषधी गुणांची उत्सुकतेने माहिती घेत खरेदी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक ज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विविध गुणकारी रानभाज्या
♦ कुर्डू- रक्तवाढ व अशक्तपणा दूर करण्यासाठी गुणकारी. ♦ टाकळा (टाहकळा)- त्वचारोग, पोटाचे विकार व बद्धकोष्ठतेवर उपयुक्त.
♦ शेवळ- सांधेदुखीवर आराम व हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर.
♦ भारंगी- सर्दी, खोकला व दम्यावर आयुर्वेदिक औषध म्हणून कार्य करते. ♦ कर्टुले- सर्वांत पौष्टिक मानली जाणारी ही भाजी मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
Wild vegetable vigil at Kalvan weekly market