‘गोमाता’ म्हणायची… मग नर वासरांचे काय?

सिन्नरच्या पूर्व भागात गोणपाटात बांधून वासरे सोडून देण्याचे प्रकार

सिन्नर : प्रतिनिधी
गायीला ‘गोमाता’ म्हणून पूजणार्‍या ग्रामीण भागातच नर वासरांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर होत आहे. दुग्ध व्यवसायातील वाढता खर्च आणि बदलती शेती व्यवस्था यामुळे नर वासरांचा सांभाळ करणे शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत आहे. त्यातूनच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात, विशेषतः समृद्धी महामार्गालगतच्या निर्जन ठिकाणी गोणपाटात वासरे बांधून सोडून देण्याचे प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी दुशिंगवाडी शिवारात अशाच प्रकारे सापडलेल्या दोन वासरांना नागरिकांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले.
दुग्ध व्यवसायासाठी मादी वासरू म्हणजेच कालवड भविष्यातील दूध उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. मात्र, नर वासराच्या संगोपनासाठी दूध, चारा आणि औषधोपचाराचा नियमित खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांसमोर त्यांचा सांभाळ करण्याचे आव्हान निर्माण होते. पूर्वी नर वासरांची विक्री होत असे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्यांना घेणारे कमी झाल्याने काही ठिकाणी वासरे निर्जनस्थळी सोडून देण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून येते.
नर वासरांची नोंद कुठेच नाही!
नर वासरांच्या जन्माची आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनाची अधिकृत नोंद मोठ्या प्रमाणावर होत नसल्याने या समस्येचे नेमके प्रमाण समोर येत नाही. जनावरांना टॅगिंग करण्याची आवश्यकता असल्यासच अनेक शेतकरी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधतात. त्यामुळे वासरांच्या जन्माची नियमित नोंद उपलब्ध नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
नर वासरांचा सांभाळ करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक व तांत्रिक मदत, तसेच गरजू जनावरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पशुसंवर्धन विभाग, गोशाळा आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून अशा जनावरांच्या संगोपनासाठी प्रभावी व्यवस्था उभारल्यास वासरे सोडून देण्याचे प्रकार रोखण्यास मदत होऊ शकते. सिन्नरच्या पूर्व भागातील काही रस्त्यांच्या कडेला मृत कोंबड्या टाकून देण्याचे प्रकार यापूर्वीही आढळले आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांकडून मृत कोंबड्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरून उघड्यावर टाकल्या जात असल्याने त्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढतो. आता वासरेही अशा पद्धतीने सोडून दिली जात असल्याने परिसरातील स्वच्छता आणि भटक्या प्राण्यांचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

गोणपाट उघडताच दोन जिवांची धडपड

दोन दिवसांपूर्वी दुशिंगवाडी शिवारात समृद्धी महामार्गाच्या कुंपणालगत नंदू गोराणे यांना एका गोणपाटात हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने गोणीचे तोंड सोडले असता त्यात दोन वासरे गुदमरलेल्या अवस्थेत आढळली. बराच वेळ बंदिस्त असल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. गोराणे यांनी त्यांना पाणी पाजून घरी नेले. वेळीच मदत मिळाल्याने दोन्ही वासरांचे प्राण वाचले.

जनावरांना टॅगिंग करायचे असल्यासच शेतकरी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करतात. वासरांच्या जन्माची नोंद शक्यतो केली जात नाही. दीड वर्षापूर्वी झालेल्या पशुगणनेचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. नको असलेल्या जनावरांच्या संगोपनासाठी पशुसंवर्धन विभागाकडे स्वतंत्र योजना नाही. गोशाळांना शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे अशा जनावरांच्या संगोपनासाठी गोशाळा हा पर्याय ठरू शकतो.
– सचिन शेळके, पशुसंवर्धन अधिकारी, सिन्नर पंचायत समिती

We call the cow ‘Gomata’ (Mother Cow)… but then, what about the male calves?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *