काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्याची आवश्यकता

राहुल गांधींचा जिल्हाध्यक्षांना कानमंत्र

नाशिक : प्रतिनिधी
आगामी काळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविताना केवळ राष्ट्रीय पातळीवरील राजकीय मुद्द्यांवर अवलंबून न राहता प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांंवर पक्षाने आक्रमकपणे काम करावे. जनतेशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरावे, अशी दिशा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (दि. 2) दिली. पक्षात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम तरुण कार्यकर्त्यांना पुढे आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या ‘सृजन संघटन’ उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये आयोजित राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या दहा दिवसीय शिबिराचा समारोप राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला. राज्यातील 72 पैकी 69 जिल्हाध्यक्ष या शिबिरात सहभागी झाले होते. समारोपापूर्वी राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांशी स्वतंत्रपणे संवाद साधत त्यांच्या जिल्ह्यातील संघटनात्मक परिस्थिती, स्थानिक समस्या आणि पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला शिबिरात ‘जागतिक राजकारण आणि भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना राहुल गांधी यांनी जागतिकीकरण, देशाची अर्थव्यवस्था, रोजगार आणि उत्पादन क्षेत्रातील आव्हानांवर भूमिका मांडली. भारतात रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चीनकडून होणारी मोठ्या प्रमाणातील आयात कमी करून देशातील उत्पादनक्षमता वाढविणे आणि रोजगारनिर्मितीवर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या अडचणी, नागरी सुविधांचा अभाव, आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न यांसह ‘एसआयआर’सारख्या संवेदनशील विषयांवर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जनतेची भूमिका समजून घेत ठामपणे उभे राहावे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या प्रश्नांंवर केवळ निवेदने देणे किंवा आंदोलनांची घोषणा करणे पुरेसे नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांचे म्हणणे ऐकणे आणि प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्षांनी पक्षाची वैचारिक भूमिका स्पष्टपणे जनतेपर्यंत पोहोचवावी. आंदोलन करताना पक्षाची विचारधारा आणि त्याच्या मर्यादा यांचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या राजकीय भूमिकेचा दाखला देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यालयाची पायरी न चढण्याची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.सामान्य नागरिकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी आपली कार्यपद्धती आणि स्वभावातही बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. लोकांचे म्हणणे ऐकणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांच्या कामासाठी उपलब्ध राहणे, हा पक्षाच्या संघटन विस्ताराचा महत्त्वाचा भाग असावा, असा संदेश त्यांनी दिला.ज्येष्ठ नेत्यांना या शिबिरापासून तुलनेने दूर ठेवून तरुणांना केंद्रस्थानी का आणण्यात आले, यामागील भूमिकाही यावेळी स्पष्ट करण्यात आली.

राहुल गांधींची जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशी आपुलकीची भेट
काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यातील 78 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप बुधवारी (दि. 2) राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. राहुल गांधी यांनी कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधत पक्षासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तरुणांशी संवाद साधताना त्यांनी ‘जेन झी’च्या विचारांबाबतही जाणून घेतले. यवतमाळचे जिल्हाध्यक्ष ड. सचिन नाईक यांच्या कुटुंबीयांनी राहुल गांधी यांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. शर्मिष्ठा नाईक यांनी राहुल गांधींच्या ‘स्मॅश द पेट्रिआर्की’ भूमिकेने तरुणींमध्ये सकारात्मक चर्चा निर्माण झाल्याचे सांगितले

काँग्रेस एक विचारांचे घर : माणिकराव ठाकरे
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व संघटनात्मक परिस्थिती जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रमुख नेते, विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. संघटनेची सद्यस्थिती, कार्यकर्त्यांच्या अडचणी, जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया, प्रशिक्षण आणि आगामी संघटनात्मक कामाची दिशा यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांमध्ये संवाद, जवळीक आणि विश्वास वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे ठाकरे म्हणाले.राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. पक्षासाठी काम करताना कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची असते. ‘काँग्रेस एक घर आहे, विचारांचे घर आहे,’ या भावनेतून ही भेट घेण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये भविष्यातील नेतृत्व तयार करण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी देण्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले. पक्षात पुढे येणारा कार्यकर्ता केवळ राजकीयदृष्ट्या नव्हे, तर मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज संघटनेत तयार होणारी ही तरुण फळीच भविष्यात आमदार आणि खासदार म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधींनी घेतला नाशिकच्या खड्ड्यांचा अनुभव

नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बुधवारी (दि. 2) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. जिल्हाध्यक्षांच्या शिबिरासाठी नाशिकमध्ये आलेल्या राहुल गांधी यांनी शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाची माहिती जाणून घेतली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे आणि वाहतूक व्यवस्थेवर प्रशासनाकडून भर दिला जात असताना अनेक भागांतील खड्डे अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाशिकच्या रस्त्यांच्या प्रश्नाकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधले.

 

The need to strengthen the Congress party’s organizational base.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *