– सविता एरंडे
मीरा, ये मीरा, अगं इकडं ये ना जरा! राधाबाई आपल्या खोलीत आरशासमोर बसून आपल्या सूनबाईंना हाका मारत होत्या. आले, आले आई. असं म्हणत मीरा राधाबाईंच्या खोलीत आली. सासूबाई आरशासमोर बसलेल्या आहेत हे पाहून, आई, काय हवंय तुम्हाला? अगं मीरा, तुझ्याकडे ती कपाळावर लावायची बिंदी आहे ना? ती दे ना जरा शोधून. हो आहे ना, देते लगेच शोधून तुम्हाला…मीराने बिंदी शोधून व व्यवस्थित लावून दिली व म्हणाली, आज तुमच्या सखी मंडळात काही कार्यक्रम आहे वाटतं..? अगं हो ना मीरा… आज आमच्याकडे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत आणि आम्ही चार-पाच जणी मिळून एक गवळण सादर करणार आहे… अरे व्वा! खूपच छान मग! छान झालाय मेकअप आई तुमचा! थांबा मी तुमचा एक मस्त फोटो काढते… असं म्हणून मीरानं सासूबाईंचा फोटो काढून त्यांना दाखवला. फोटो पाहून राधाबाई जरा लाजल्याच… राधाबाईंचे यजमान अकस्मात स्वर्गवासी झाले. त्यामुळं राधाबाई बरेच दिवस डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. कुणाशी बोलत नव्हत्या. मग एक दिवस शेजारच्या काकूंनी त्यांना आपल्याबरोबर सखी मंडळात नेले. तेथे त्या हळूहळू रमायला लागल्या. सर्वांशी बोलायला लागल्या. आता त्या छान रमल्या होत्या मंडळात. ही सगळी मंडळाची किमया!
सध्या ’आनंदी आनंद गडे/ छंद मंडळे चोहीकडे’ असंच कांहीसं वातावरण दिसून येतं. विविध प्रकारची मंडळं अगदी वसंत ऋतूसारखी बहरलेली दिसतात. अनेक लोक यात सहभागी होऊन जीवनाचा आनंद लुटतात. स्वतःला आनंदी ठेवतात. खरंतर ग्रुप किंवा मंडळं, टोळ्या याला प्राचीन परंपरा आहे. आपले आदिमानवदेखील जंगलात समुदायाने किंवा टोळ्याटोळ्यांनी राहत होते. वन्यप्राणीदेखील टोळ्याटोळ्यांनी जंगलात विहरताना दिसतात.पक्षीदेखील आकाशात विहरताना थव्याथव्याने विहार करताना आपण पाहतो. ना स्फूर्ती येते व ’बगळ्यांची माळ झुले अजुनी अंबरात’ अशी काव्ये सुचतात. हे पक्षीदेखील थव्याथव्याने स्थलांतर करतात. रामायणातदेखील समस्त वानरसेना टोळ्यांनीच राहत होती. आपला सर्वांचा लाडका कृष्ण कन्हैया तर सर्व बालगोपाळांना जमवून गोपाळकाला करून खायचा, गवळणींच्या खोड्या काढायचा. म्हणजेच सर्वांना सर्वांसोबत राहणं खूप आवडतं. सर्व मानव समाजप्रिय आहे. एकटं राहणं शारीरिक व मानसिकदृष्ट्या जरा त्रासदायकच आहे. आपल्याला थोडा तरी विरंगुळा हवा असतो, एकमेकांची सोबत हवी असते. सध्याच्या अति वेगवान तांत्रिक युगामध्ये माणूस माणसापासून दूर राहू लागलाय. व्यवसाय, नोकरीनिमित्त कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून दूर राहताना दिसतात. तसेच मुलं मोठी झाली की त्यांच्या व्यवसायानिमित्त परगावी, परदेशी राहतात.अनेक कारणांमुळे आई, वडील हे आपल्या गावीच राहणं पसंत करतात. कधीकधी जोडीदाराची सोबत अचानक तुटते. अशा अनेक कारणांनी आयुष्यात एकटेपणा जाणवतो. अशावेळी मनाला काहीतरी विरंगुळा हवा असतो. कोणाची तरी सोबत हवी असते, आधार हवा असतो. तेव्हा ही विविध प्रकारची मंडळं एकमेकांसाठी ’आधार केंद्रे’ वाटतातच. शिवाय एक सुरक्षितता वाटते. रिकामं मन सैतानाचं धन, असं म्हणतात ते खोटं नाही. (क्रमश:)
Associations have proliferated.