अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका

सिन्नर : प्रतिनिधी
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आल्याने शेतकर्‍यांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. मात्र, खरीप हंगामात पिकांना पाण्याची गरज वाढलेली असताना, प्रत्यक्षात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पावसाने ओढ दिल्याने विहिरीतील उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असताना वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे सिंचनात अडथळे येत आहेत.
ग्रामीण भागात सकाळी सव्वानऊ ते सायंकाळी सव्वापाच या वेळेत थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. मात्र, हा पुरवठाही अखंडित नसल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने मका, सोयाबीनसह खरीप पिके करपू लागली असून, उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. दरम्यान, रात्री-अपरात्री नेमकी कशामुळे वीजपुरवठा खंडित होतो, यासंदर्भात महावितरणकडे चौकशी केल्यानंतर हे तातडीचे भारनियमन असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार ते करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, या अघोषित भारनियमनासंदर्भात कुठल्याही प्रकारे ग्राहकांना अवगत केले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मका व सोयाबीनची पिके वाढल्याने अनेक भागांत बिबट्यांना लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिवास मिळाला आहे. रात्री वीज नसल्याने शेतकर्‍यांना घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. अंधाराचा फायदा घेत बिबट्यांचा वावर वाढला असून, अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची कुत्रीही गायब
होत आहेत.

ग्रामीण भागात सोलर प्रकल्प वाढले तरी निर्माण होणारी वीज स्टोअरेज करण्यासाठी कुठलीही यंत्रणा महावितरणकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची समस्या सुटली नाही. ही योजना केवळ ठेकेदारांच्या हितासाठीच बनवली गेली का, असा प्रश्न आहे. महावितरणने सकाळी सव्वानऊ ते सायंकाळी सव्वापाच या वेळेत अखंडित व पुरेसा वीजपुरवठा करावा म्हणजे शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे सोपे होईल.
– अरुण वाघ, सरपंच, भोकणी

दूध काढण्याच्या वेळेतच वीज गायब

संध्याकाळी पाच ते सात या वेळेत पशुपालकांची गायींचे दूध काढण्याची वेळ असते. नेमक्या याच काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने मिल्किंग मशीन बंद पडतात. परिणामी, शेतकर्‍यांना हाताने दूध काढावे लागत आहे. पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पशुधन आणि दुग्ध व्यवसाय असल्याने अनेक शेतकरी पेट्रोल-डिझेल इंजिनच्या मदतीने मिल्किंग मशीन चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

मका व सोयाबीनची उंच पिके, वाढलेला बिबट्यांचा वावर आणि रात्रीच्या वेळी होणारे अघोषित भारनियमन यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घराबाहेर पडताना अंधारामुळे धोका निर्माण होत असल्याने वाड्या-वस्त्यांवर रात्री सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी.
– सुनील यादव, शेतकरी, वल्हेवाडी

Farmers distressed due to unannounced load-shedding!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *