आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका
मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये पुन्हा एकदा जुंपली असून, एकमेकांवर टीकास्त्र सोडले आहे. रद्द झालेले दाखले दुरुस्त करण्यात येतील, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने आश्वासन दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी आरक्षण उपसमितीला जीआर काढण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल करत ओबीसीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा देत थेट सरकारलाच घरचा आहेर दिला. मनोज जरांगे यांनी, या वयात त्यांनी स्वतःचे राजकारण पाहावे, पुतण्याला खासदार कसे करता येईल ते पाहावे. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळे खाल्ले, अशा शब्दांत भुजबळांवर टीका केली.
मराठ्यांवर किती जळणार? मनोज जरांगे यांचा सवाल
राज्याचे मंत्री छगन भुजबळांनी मराठा उपसमितीच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या वयात त्यांनी स्वतःचे राजकारण पाहावे, पुतण्याला खासदार कसे करता येईल ते पाहावे. ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळे खाल्ले, अशा शब्दांत जरांगे यांनी टीका केली. वेळ पाहून कधी महाविकास आघाडीमध्ये जातात, कधी महायुतीमध्ये जातात, कधी अजितदादांसोबत जातात. यांनी ओबीसी महामंडळ खाल्ले, महाराष्ट्र सदनही सोडले नाही, अशी जळजळीत टीका जरांगे यांनी भुजबळांवर केली.
राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाज मोठा आहे. एवढ्या मोठ्या समाजाला फक्त 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ओबीसींची संख्या ही 60 टक्के आहे हे भुजबळांना कुणी सांगितलं? या दोन दिवसात भुजबळांना काय झालं? आता यांना पोळी भाजायची असेल. पुतण्याला खासदार करायचे असेल.आपण यांना आता महत्व देणं कमी करावे.
सरकार आणण्यात ओबीसींचाही महत्त्वाचा हातभार : ना. भुजबळ
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र, तोडगा निघाला नाही. या सर्व घडामोडींवर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र घेताना दाखल्यावर खाडाखोडी करण्यात आल्या आहेत. आता ते दाखले तुम्ही स्वीकारणार आहात का? जात पडताळणी समितीवर कुणीही दबाव आणू नये. राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे. ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभारआहे, असे छगन भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ म्हणाले की, जात पडताळणी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यावर कुणीही दबाव आणता कामा नये. काही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने नाकारली आहेत. ती दुरुस्त करून देतो, असं काही आमदार म्हणाले आहेत. आता माझा त्या आमदारांना सवाल आहे की, मुंबईत 4 नगरसेवकांचं जात पडताळणीत प्रमाणपत्र रद्द ठरले आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद गेले आहे. आता ते देखील तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का? असे म्हणत त्यांनी प्रसाद लाड यांना टोला लगावला. छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आता मराठा कुणबी मंत्रालय करायचं सुरू आहे? आता हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा. कधी एसईबीसी आरक्षण घेत आहेत, आमचे सतत मंत्री जातात लाड पुरवायला. आमचे एक नेते गेलेच होते लाड पुरवायला. एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांबाबत बोलला तर ताबडतोब पोलीस जाऊन पकडतात आणि इथे तर सतत खालची भाषा बोलली जात आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला 750 कोटी आणि ओबीसी समाजाच्या समितीला केवळ 5 कोटी हे कसं काय चालेल? मी त्यामुळे त्या दिवशी समन्वय समितीच्या बैठकीतून उठून बाहेर आलो. हे अजिबात चालणार नाही. एकीकडे हॉस्टेल तयार झाले आहे. एसी हॉस्टेल आहेत आणि दुसरीकडे अद्याप काहीच नाही? हे अजिबात चालणार नाही. एकीकडे स्थानिक पातळीवर मराठा आरक्षण उपसमिती निर्णय घेत आहे. जीआर काढत आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? आम्ही देखील इकडे विविध समितीत काम केलं आहे. आता ओबीसी समितीने असं केलं तर चालेल का? समितीचे प्रमुख विखे असं करणार असतील तर मी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला आहे.
Bhujbal and Jarange clash again.