पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली : प्रतिनिधी
दिल्लीतील साउथ कॅम्पसजवळील सत्यनिकेतन परिसरात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ’हॉस्टेल डेझ’ नावाची पाचमजली बॉईज पीजी (वसतिगृह) इमारत अचानक कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत वसतिगृहाच्या मुख्य इमारतीसह शेजारील एक इमारतही कोसळली. आतमध्ये अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्ली अग्निशमन दलाला दुपारी 1:33 वाजता घटनेची माहिती मिळताच, आठ अग्निशमन गाड्यांसह बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक चौकशीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारतीत सुमारे 40 ते 50 विद्यार्थी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ढिगार्याखालून अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ढिगार्याखाली अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी आतूनच मदतीसाठी फोन केल्याने तसेच रडण्याचे आवाज येत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. एनडीआरएफ, डीडीएमए, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि श्वान पथकाच्या मदतीने उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बेकायदेशीर बांधकामामुळे दुर्घटना
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इतर लगतच्या इमारती तातडीने रिकाम्या केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, या बेकायदेशीर बांधकामाला जबाबदार असणार्यांवर सर्वात कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
Three killed in hostel building collapse in Delhi.