’समृद्धी’वर कंटेनरला कारची धडक, दोघांचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
शिर्डीकडे निघालेल्या वसईतील तिघांचा प्रवास समृद्धी महामार्गावर काळरात्रीत बदलला. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात चालकाला डुलकी आल्याने किया कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुढे धावणार्‍या कंटेनरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी (दि. 6) पहाटे 5.10 वाजता हा अपघात झाला. किया कार (एमएच 48- डीएक्स 9432) वसईहून शिर्डीच्या दिशेने जात होती. गोंदे शिवारातील चॅनल क्रमांक 564.2 येथे चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले. कारने पुढे जाणार्‍या कंटेनर ट्रक (एमएच 46- सीयू 7702)ला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातात शबनूर अजित कोठारीवाला (वय 24) आणि प्रिन्स ऊर्फ सतीश पेशवानी (39, दोघेही रा. वसई पूर्व, जि. ठाणे) यांचा मृत्यू झाला. शब्बीर अजित कोठारीवाला (रा. वसई) गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. जखमीला सिन्नर येथील परम साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिस तपास सुरू आहे.

Car crashes into container on ‘Samruddhi’ Expressway; two dead.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *