मनमाड भागात मका पीक करपले, बळीराजा दुहेरी संकटात
मनमाड: प्रतिनिधी
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे मनमाड व नांदगाव तालुक्यातील मका पीक पूर्णपणे जळून खाक होण्याच्या मार्गावर आहे. ऐन वाढीच्या व खरिपाच्या मुख्य टप्प्यातच पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
एकीकडे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असताना, दुसरीकडे मागच्या वर्षीचा पीकविमा अद्याप मिळालेला नाही. यंदाही तीच बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.राज्यातील आणि देशातील सरकार हे धनदांडग्यांचे व उद्योगपतीचे सरकार आहे. हजारो कोटींचे कर्ज ते अवघ्या काही कोटींत सेटल करतात. मात्र, शेतकर्यांना व्याजावर व्याज लावतात, असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले आहे.
नांदगाव तालुक्यात सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्यांनी मोठ्या आशेने बाजरी व मक्याची पेरणी केली होती. महागडी बियाणे, खते आणि मशागतीवर हजारो रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली आहे. कडक ऊन आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मक्याची ताटे शेतातच सुकू लागली असून, पाने पिवळी पडली आहेत. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटल्याने चारा छावणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकर्यांनी पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मोठ्या अपेक्षेने पीकविमा भरला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे मागच्या वर्षीचा हक्काचा पीकविमा अद्याप मिळालेला नाही. ‘मागचा विमा कपाटात आणि यंदाचे पीक उन्हात,‘ अशी अवस्था तालुक्यातील शेतकर्यांची झाली आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे होऊनही मदत न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. चालू हंगामातही पावसाची हीच गंभीर स्थिती कायम राहिल्यास यंदाही पीकविमा मिळण्याची शाश्वती नसल्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि पुढील रब्बी हंगामासाठी भांडवल कुठून आणायचे, अशा विवंचनेत बळीराजा अडकला आहे.
तालुक्यात तातडीने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून पिकांचे पंचनामे करण्यात यावेत. गेल्या वर्षीचा प्रलंबित पीकविमा शेतकर्यांच्या खात्यावर त्वरित वर्ग करण्यात यावा. यंदाच्या नुकसानीसाठी शासनाने हेक्टरी विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.
उद्योगपती आणि धनदांडग्यांचे सरकार
सध्या देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. हे सरकार शेतकरी आणि कष्टकरी विरोधातले सरकार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज अवघ्या काही कोटींत सेटल करते. मात्र, शेतकरी बांधवांना त्यांचा हक्काचा विमा देत नाही. कर्जमाफीची केवळ घोषणा केली जाते. मात्र, शेतकरी बांधवांच्या पदरात काहीच पडत नाही. अशा दळभद्री सरकारचा आम्ही निषेध करतो.
– अनिल चव्हाण, शेतकरीमहागडे बियाणे आणि खते कर्ज काढून आणली. मका चांगला येईल म्हणून रक्ताचं पाणी केलं. पण पावसाने ऐनवेळी दगा दिला. डोळ्यादेखत उभं पीक जळून चाललंय. काळजाचा तुकडा तुटल्यासारखं वाटतंय. गेल्या वर्षी पिकाचं नुकसान झालं म्हणून विमा भरला होता. तो अजून मिळाला नाही. यावर्षीही तीच परिस्थिती आहे. पदरात काही पडेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. सरकारनेच आता आम्हाला वाचवावं, नाहीतर आमचं जगणं कठीण होईल.
– बाळू जाधव, पीडित शेतकरी
Rain has given Nandgaon taluka a miss.