मालेगावात खळबळ, शिक्षकांचा ठिय्या
मालेगाव : प्रतिनिधी
येथील म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांसमोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीच्या मानसिक तणावाने कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
दरम्यान, या घटनेने संतप्त झालेल्या शिक्षक, प्राध्यापक व सेवकांनी शहर पोलीस ठाण्यात प्रा. बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा संतप्त शिक्षकांनी घेतला होता. अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी ठिय्या आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची भेट घेत या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले
शाळेच्या कार्यालयातच हृदयविकाराच्या झटका येऊन मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव सोपान खंडेराव बोरसे (वय 52, रा. वजीरखेडे) आहे. मंगळवारी सकाळी म्युनिसिपल ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना नाशिक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांच्यासह चार अधिकार्यांचे पथक शाळेत चौकशीसाठी दाखल झाले होते. या पथकातील अधिकार्यांनी शिक्षकांशी अरेरावीने बोलून त्यांना उद्धट वागणूक दिली तसेच चौकशीसाठी पुन्हा प्राध्यापक सोपान बोरसे यांना तातडीने पाचारण करण्याचे निर्देश दिले त्यामुळे वर्गात परीक्षा घेत असलेले बोरसे पळतच कार्यालयात पथकासमोर गेले असता तिथेच त्यांना मानसिक तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन ते कार्यालयात कोसळले उपस्थित शिक्षकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले चौकशी अधिकार्यांच्या दडपशाहीमुळेच प्राध्यापक बोरसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठिय्या आंदोलन करणार्या शिक्षक व प्राध्यापकांनी केला
Professor dies of a heart attack right in front of the inquiry committee.