प्रतिबंधित पदार्थ विक्री विरोधात दुकानदारांना नोटिसा

पाटोळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेचा जनजागृतीसाठी पुढाकार

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाटोळे येथे शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, पानमसाला तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, मुख्याध्यापक वसंत गोसावी, शिक्षक कैलास पवार, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश बैरागी आदी
उपस्थित होते.
गावातील लहान मुले व विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे, शाळेच्या परिसरात तसेच गावामध्ये प्रतिबंधित पदार्थांची विक्री होऊ नये आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम
राबविण्यात आला.
यावेळी दुकानदारांना प्रतिबंधित पदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण करू नये, तसेच शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य किंवा आरोग्यास घातक पदार्थ विकू नयेत, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होऊ शकते, याचीही जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही केवळ शाळेची नव्हे, तर संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे. पाटोळे गाव व्यसनमुक्त व आरोग्यदायी बनविण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा, पालक, दुकानदार आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी
देण्यात आला.
या उपक्रमामुळे ‘विद्यार्थी प्रथम – व्यसनाला नकार’ हा सकारात्मक संदेश गावात पोहोचला असून, पाटोळे गाव व्यसनमुक्तीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाटोळे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या या संयुक्त उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Notices issued to shopkeepers for selling banned substances.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *