महागाईच्या झळांनी बाप्पाचा प्रसाद महागला साखर, दूध, खवा महागल्याने मोदक, पेढ्यांच्या दरात वाढ

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पाश्वर्र्भूमीवर गणपती बाप्पाच्या नैवेद्यालाही महागाईची झळ बसली आहे. साखर, दूध आणि खव्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे मोदक, पेढे, लाडू व विविध मिठाईच्या दरांत वाढ झाली आहे. त्यात काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसारख्या सुकामेव्याच्या वाढलेल्या दराची भर पडल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. मिठाईच्या दरात किलोमागे सुमारे 120 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मावा आणि सुकामेवा मोदकांच्या दरात 200 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
गणेशोत्सव म्हटले की, मोदकाला विशेष महत्त्व असते. घराघरांत उकडीचे मोदक तयार केले जात असले, तरी बाजारातील मावा, काजू, खोबरे आणि सुकामेवा मोदकांनाही मोठी मागणी असते. पेढे, लाडू आणि अन्य मिठाईची खरेदीही या काळात वाढते. मात्र, यंदा कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाई तयार करण्याचा खर्च वाढला आहे. दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीच्या प्रमाणावरही झाला आहे. पूर्वी एक किलो किंवा त्यापेक्षा अधिक मिठाई घेणारे ग्राहक आता पाव किलो किंवा अर्धा किलो खरेदी करण्यास पसंती देत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मिठाई खरेदी करणार्‍या मंडळांच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रेत्यांच्या मते, ही दरवाढ नफा वाढविण्यासाठी नसून कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम आहे.

विविध मिठाईचे दर
पेढे, बर्फी : 800 ते 1,000 रुपये किलो
बुंदी, बेसन व डिंकाचे लाडू : 600 ते 800 रुपये किलो
हलवा : 800 ते 1,400 रुपये किलो
ड्रायफ्रूट चिक्की : 1,000 ते 1,500 रुपये किलो
पारंपरिक मोदक : सुमारे 1,250 रुपये किलो
ड्रायफ्रूट मिठाई : सुमारे 1,500 रुपये किलो
मोदक : किलोमागे सुमारे 120 रुपयांपर्यंत
पेढे : किलोमागे सुमारे 120 रुपयांपर्यंत
मावा मिठाई : किलोमागे सुमारे 120 रुपयांपर्यंत
मावा मोदक : 200 ते 300 रुपयांपर्यंत
सुकामेवा मोदक : 200 ते 300 रुपयांपर्यंत

साखर, दूध, खवा तसेच सुकामेव्याच्या किमती वाढल्याने मिठाईचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे त्यानुसार मोदक आणि मिठाईच्या दरात वाढ करावी लागत आहे. दरवाढीमुळे ग्राहकांकडून पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात खरेदी केली जात आहे.
– सागर शर्मा, मिठाई विक्रेता

Soaring prices make Bappa’s *Prasad* costlier; rates of *Modaks* and *Pedhas* rise due to the increased cost of sugar, milk, and *Khoya*.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *