नाशिक : प्रतिनिधी
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शेतकर्यांच्या थकीत ऊस पेमेंटवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. उसाचे गाळप झाले तर साखर विक्रीचे पैसे गेले कुठे, असा थेट सवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत उपस्थित केला. याबाबत प्रसाद घावटे अँड कंपनीच्या प्रतिनिधीला चांगलेच खडे बोल सुनावले. शेतकर्यांनी तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल करत धारेवर धरले.
नाशिक साखर कारखान्याचा खंडित झालेला वीजपुरवठा आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्या थकीत पेमेंटसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे, जिल्हा बँक प्रशासक संतोष बिडवई,नासाका आवसयिक प्रदिप आव्हाड, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, व्यवस्थापक मिलिंद देवकुटे, नासाका ओएस सुधाकर गोडसे, विष्णुपंत गायखे, तानाजी गायधनी, जगन्नाथ आगळे, बाबुराव मोजाड, शिवाजी गायधनी, अनिल गायधनी, सुनील गायधनी, संजय गायधनी, कैलास टिळे, पंडित आवारे, विलास गायधनी, शिवाजी म्हस्के, नामदेव गायधनी, आदी शेतकरी उपस्थित होते.
अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेडने नासाका भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला. परंतु अष्टलक्ष्मी कंपनीने प्रसाद घावटे अँड कंपनीला हा कारखाना सबलीजवर चालविण्यास दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे पेमेंट देण्यावरून अष्टलक्ष्मी आणि घावटे कंपनीकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचे बैठकीत समोर आले. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर चालविणार्या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याने अंतिम तोडगा निघू शकला नाही.
17 सप्टेंबरला निर्णायक बैठक
या बैठकीला मूळ भाडेधारक उपस्थित नसल्याने खासदार वाजे व खा. भगरे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी व कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवून चालणार नाही.कारखाना सुरू करण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा अंतिम तोडगा काढण्यासाठी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा विशेष बैठक घेण्यात येणार आहे.
खासदार वाजे आक्रमक
आम्ही केवळ उसाचे गाळप केले. त्यानंतर साखरेची विक्री अष्टलक्ष्मी कंपनीने केली, असे स्पष्टीकरण घावटे कंपनीच्या प्रतिनधीने यावेळी देताच खासदार वाजे चांगलेच आक्रमक झाले. खा. वाजे यांनी, अष्टलक्ष्मी आणि तुम्ही दोघे मिळून कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढा. काही करा; परंतु शेतकर्यांना पैसे द्या, अशी आक्रमक भूमिका घेतली.
900 शेतकर्यांचे सुमारे 4 कोटी थकले
मागील गळीत हंगामातील सुमारे 900 ऊस उत्पादकांचे तीन कोटी 90 लाख रुपयांचे ऊस बिल अद्याप अदा झालेले नाही. त्याचबरोबर कारखान्यातील कर्मचार्यांचे पाच महिन्यांचे सुमारे एक कोटी 50 लाख रुपये वेतन थकीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगार दोन्ही घटक आर्थिक संकटात सापडले आहेत. याशिवाय कारखान्याचे सुमारे 15 लाखांंचे वीजबिल थकीत असल्याने मागील सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित आहे.
Where did the money from sugar sales go?