शहरात धावली पहिली इलेक्ट्रिक सिटी बस; 526 प्रवाशांचा प्रतिसाद
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या पीएमई योजनेंतर्गत नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक)च्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिली ई-बस मंगळवारी (दि. 15) नाशिकच्या रस्त्यावर प्रवासी सेवेत धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी या बसेसचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर ही बस मंगळवारपासून (दि.15) नाशिककरांच्या सेवेत आली आहे.
सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे आणि उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ई-बस डेपोमधून प्रवासी सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आली.
सिटीलिंकच्या ई-बस सेवेच्या प्रारंभिक टप्प्यात दोन बसेसच्या माध्यमातून तपोवन ते बारदान फाटा व तपोवन ते सिम्बायोसिस कॉलेज या मार्गावर सुरू झाली आहे. नाशिककरांना पर्यावरणपूरक, आरामदायी, शांततामय आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळणार आहे. सकाळी 10.30 वाजेपासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत दोन ई-बसेसच्या माध्यमातून ये-जा अशा एकूण चार फेर्या करण्यात आल्या. या चार फेर्यांमधून एकूण 526 प्रवाशांनी सिटीलिंकच्या ई-बससेवेचा लाभ घेतला. ई-बसचा आरामदायी प्रवास, कमी आवाज तसेच पर्यावरणपूरक सेवेबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. ई-बस सेवेसाठी कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ करण्यात आलेली नाही. प्रवाशांकडून विद्यमान बस भाडेदरानुसारच प्रवासाचे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ई-बस सेवेला नाशिककरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिटीलिंकच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषणात घट, ध्वनिप्रदूषण कमी होणे, तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे. नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने ई-बससेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाशिककरांनी पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा स्वीकार करून मार्ग क्र. 102 व 103 वरील सिटीलिंकच्या ई-बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे टप्प्याटप्प्याने उर्वरित ई-बसेस नाशिक शहरातील विविध मार्गांवर प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.
ई-बसचे मार्ग
1. मार्ग क्रमांक 102 ः तपोवन टर्मिनस ते बारदान फाटामार्गे जुना आडगाव नाका, रविवार कारंजा, सीबीएस, राजीव गांधी भवन, एचपीटी कॉलेज, महात्मानगर, आयटीआय, सातपूर मनपा विभागीय कार्यालय, सातपूर कॉलनी, अशोकनगर.
2. मार्ग क्रमांक 103 ः तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस कॉलेज मार्गे जुना आडगाव नाका, सीबीएस, वेद मंदिर, पवननगर.
Now, a cool and comfortable commute for the people of Nashik!