महालक्ष्मीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज

महिलांची डेकोरेशनसह फराळाची लगबग

नाशिक : प्रतिनिधी
गणपती पाठोपाठ महालक्ष्मी अर्थात, गौराईंचे आगमन गुरुवारी (दि. 17) होणार आहे. त्यासाठी महिला वर्गाची मोठी धावपळ सुरू झाली आहे. गौराई स्थापन करण्यापासून ते सवाष्ण जेवण, हळदी-कुंकू समारंभासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. गौराईचे रूप अधिक खुलून दिसावे यासाठी साड्या, त्यांचा मेकअप, ज्वेलरी, फळाफुलांची सजावट, हार, माळा, तसेच मुकुट आदी साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे.
हरितालिका पूजन आणि गणेशस्थापनेनंतर महालक्ष्मीचे आगमन होते. यंदा दि. 17 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे आगमन, दि. 18 पूजन आणि दि. 19 सप्टेंबरला गौराईंना निरोप देण्यात येईल. तीन दिवसांच्या गौराइर्ंच्या आगमनासाठी महिनाभर आधीपासून घराची स्वच्छता, रंगरंगोटी, साड्या, दागिने खरेदी केले जाते. गौरींसाठी विविध रंगाच्या साड्या, दागिने, इतर अलंकार, मुखवटे, साचा, तसेच पारंपरिक दागिने, तसेच नवीन थीमनुसार आपली गौराई हटके दिसावी यासाठी महिलांकडून अनेक पर्यायांचा विचार केला जातो. बाजारपेठेत कॉम्बो साडी सेटपासून त्यावर मॅचिग दागिने, अ‍ॅक्सेसरीजला पसंती मिळत आहे. असे कॉम्बो सेट पाचशेपासून काही हजारांत उपलब्ध आहेत.
गौरींंसाठी लागणार्‍या पारंपरिक दागिन्यांनी बाजारपेठ सजली आहे. बोरमाळ, नथ, कमरपट्टा, मंगळसूत्र, ठुशी, बिंदी, मोत्यांचे, खड्यांच्या दागिन्यांनाही पसंती मिळते, असे व्यावसायिक सांगतात.
गौरींच्या आगमनापूर्वी मुखवट्यांना रंगरंगोटी केली जाते. नाशिकमध्ये काही कारागीर अनेक वर्षांपासून मुखवटे रंगविण्याचे काम करतात.त्यांच्याकडे दोन महिने आधीपासून काम सुरू होते, असे कारागीर सांगतात. शहरातील सराफ बाजार, कापड बाजार, बोहोरपट्टी आणि मेनरोड परिसरात गौरींच्या सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे.

♣ सोनपावलांनी आज येणार गौराई ♣
गणरायापाठोपाठ गौराईंचे आज (दि. 17) सोनपावलांनी आगमन होणार आहे. ज्येष्ठा गौरींचे आवाहन होणार आहे. दि. 18 सप्टेंबरला गौरीपूजन होणार असून, विसर्जन 19 तारखेला हाईल. अनुराथा नक्षत्रावर गौराईचे पूजन केले जाते. तीन दिवसांच्या माहेरपणासाठी गौराई येत असतात. यावेळी महालक्ष्मी पूजन केले जातेे. गौरी पूजनाचा उत्साह घराघरांत दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून गौरींच्या आगमनासाठी महिला वर्गासह कुटुंबीयांची तयारी सुरू आहे. माहेरवाशिणींप्रमाणे घराघरांत आज गौराईंचे स्वागत केले जाईल. स्थापना, विधिवत पूजन आणि आरती, महानैवेद्य दाखविला जातो. पहिल्या दिवशी साधा नैवेद्य, दुसर्‍या दिवशी पुरणपोळी व सोळा भाज्या आणि निरोपाच्या दिवशी आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखवला जातो.

Markets ready to welcome Mahalakshmi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *