मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत; परंतु सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते अंतःकरणाने आधी एक निष्ठावंत स्वयंसेवक आहेत.
2014 मध्ये जेव्हा देशाची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती आली, तेव्हा भारत सर्वव्यापी भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकलेला होता. देशातील जनता हताश झाली होती आणि तिला एका निर्णायक बदलाची प्रतीक्षा होती. त्यानंतरच्या काळात देशाने एका अभूतपूर्व परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे. जगातील अकराव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून थेट पाचव्या आणि आता जगातील तिसरी सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर भारताने घेतलेली झेप ऐतिहासिक आहे. जागतिक मंचावर भारताची ही दमदार आर्थिक वाटचाल असो किंवा अमेरिकन टॅरिफ धोरणांपुढे ’आत्मनिर्भरता’ आणि ’स्वदेशी’च्या मंत्राने ठामपणे उभे राहणे असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलादी नेतृत्वाने ’नव्या भारता’चा नवा चेहरा जगासमोर साकारला आहे. जुन्या चुकांची दुरुस्ती करणार्या आणि नव्या आव्हानांना थेट सामोरे जाणार्या या पर्वाचा साक्षीदार असणे आणि त्याचा एक घटक असणे हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. देशातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदाचा विक्रम करणार्या या युगांतरकारी परिवर्तनाचे शिल्पकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
ऐतिहासिक निर्णय आणि सर्वसमावेशक विकासाची 12 वर्षे
प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 चे उच्चाटन, तीन तलाक बंदी, गरिबांसाठीच्या व्यापक कल्याणकारी योजना, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक किंवा ’ऑपरेशन सिंदूर’, नुकतीच यशस्वीपणे आयोजित केलेली ब्रिक्स 2026 शिखर परिषद- मोदीजींच्या धडाडीच्या निर्णयांची सूची मांडायची झाल्यास शब्दांची मर्यादाही अपुरी पडेल. देशातील महिला, शेतकरी, तरुण आणि उपेक्षित घटकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे शेकडो ऐतिहासिक निर्णय या काळात घेण्यात आले. तब्बल 25 कोटी लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढणे, ही साधी कामगिरी नाही.
गेल्या 12 वर्षांच्या काळात देशात तीन कोटींपेक्षा अधिक पक्की घरे, 15 कोटी नवीन नळजोडण्या आणि 12 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली. ’पीएम स्वनिधी’ योजनेने देशभरातील 68 लाख फेरीवाल्यांना आत्मसन्मानाने जगण्याचे बळ दिले. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 43.8 लाख कोटींचे हस्तांतरण (डीबीटी) हे देशातील पारदर्शक कारभाराचे आणि गरिबी निर्मूलनाचे सर्वार्ंत मोठे उदाहरण आहे. विकसित भारताच्या संकल्पातील मुख्य भागीदार असणार्या ’नारीशक्ती’ला 2029 पर्यंत संसदेत आणि विधानसभांमध्ये एकतृतीयांश आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्टार्ट-अप्स, एम्स, आयआयएम आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे जाळे वेगाने विस्तारले असून, आज जगातील 49 टक्के डिजिटल व्यवहार एकट्या भारतात होत आहेत. विमान वाहतूक, रेल्वे, महामार्ग आणि हरित ऊर्जा क्षेत्रात देश यशाची नवी शिखरे सर करत आहे आणि हे केवळ मोदीजींचे कणखर नेतृत्व व जनतेने त्यांच्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासामुळेच शक्य झाले आहे.
घटनात्मक पदांवर 25 वर्षे आणि अंतःकरणातील ’स्वयंसेवक’
घटनात्मक पदांवर सलग 25 वर्षे कार्य करणे हे अत्यंत खडतर आव्हान असते. पाव शतक सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही लोकप्रियतेचा आलेख सातत्याने चढता ठेवणे आणि जागतिक स्तरावर देशाची पत उंचावणे, हे या प्रवासाचे खरे फलित आहे. ही 25 वर्षे केवळ सत्ता किंवा प्रतिनिधित्वाची नव्हती, तर संविधानाने सोपवलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडण्याचा तो एक अखंड यज्ञ होता. लोकसेवा, लोककल्याण, सुशासन आणि भारताच्या जागतिक सन्मानाची पुनर्स्थापना या काळात झाली.
मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत, पण सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे ते अंतःकरणाने आधी एक निष्ठावंत स्वयंसेवक आहेत. एकेकाळी पूर्णवेळ प्रचारक आणि नंतर भाजपमध्ये संघटनमंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. 12 वर्षे, सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिल्यानंतरही त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्यभावना आणि प्रामाणिकपणा याच संस्कारातून आलेला आहे. स्वयंसेवक हा मुळातच ’कर्मयोगी’ आणि निःस्वार्थी कार्यकर्ता असतो. त्यांचे निर्णय अत्यंत सरळ, स्पष्ट आणि न्याय्य असतात. दोन मित्रांमध्ये वाद झाल्यास दोघांचे भले होईल असा तोडगा काढणे किंवा कुटुंबात तंटा निर्माण झाल्यास संपूर्ण घराचे हित कशात आहे हे पाहणे, हा त्यांचा स्वभाव आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारत हेच त्यांचे कुटुंब असल्याने त्यांनी राष्ट्रहिताशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय हा ’राष्ट्रहित सर्वतोपरी’ याच तत्त्वाला धरून असतो.
मध्यस्थांचे उच्चाटन आणि थेट लाभ
एका बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी समाजाचे सशक्तीकरण आधी करावे लागते. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेतून देशाला बाहेर काढणे हे प्रचंड आव्हानात्मक काम होते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदीजींनी सर्वप्रथम सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारावर आणि मध्यस्थांवर (दलाल) जोरदार प्रहार केला. विविध क्षेत्रांतील मध्यस्थांची साखळी त्यांनी तोडून टाकली. ’जनधन, आधार आणि डीबीटी’ या त्रिसूत्रीच्या आधारे केंद्राने पाठवलेला प्रत्येक रुपया थेट गरिबांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था त्यांनी उभी केली. 2008 मध्ये राहुल गांधी यांनीच कबूल केले होते की, त्यांच्या वडिलांच्या काळात 100 पैशांपैकी केवळ 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत होते आणि नंतर तेही पोहोचणे बंद झाले. आज मोदीजींनी ती संपूर्ण व्यवस्थाच बदलून दाखवली असून, आता 100 पैकी 100 पैसे थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.
देशाच्या सुरक्षेची नवी व्याख्या : ’न्यू इंडिया’
शत्रूचा बीमोड करण्याचे सामर्थ्य ज्या देशात असते, तोच देश खर्या अर्थाने सामर्थ्यवान मानला जातो. विकसित भारताकडे वाटचाल करत असतानाच देशाने आपली सामरिक ताकदही जगाला दाखवून दिली आहे. 2016 मध्ये जेव्हा उरी येथे दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा भारताने अवघ्या 11 दिवसांत सर्जिकल स्ट्राइक करून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारताने थेट सीमा ओलांडून बालाकोटवर एअर स्ट्राइक केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे नामशेष केले. या दोन घटनांनी भारताच्या संरक्षण धोरणाची नवी दिशा निश्चित केली. ’नवा भारत’ कसा असेल, हे मोदीजींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आणि हाच आज भारताचा ’नवा स्वभाव’ (न्यू नॉर्मल) बनला आहे. नुकतीच पहलगाम येथे अनुचित घटना घडली, तेव्हा भारताने ’ऑपरेशन सिंदूर’द्वारे शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, दुर्दैवाने विरोधक आजही पुराव्यांची मागणी करत आपल्या शूर सैनिकांवरच संशय घेताना दिसतात.
मोदीजींच्या पारदर्शक आणि प्रामाणिक कारभाराला कोणतेही उत्तर नसल्याने विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला; परंतु मोदीजींनी हा डावही उधळून लावला. महाराष्ट्रातील जनतेने या अपप्रचाराला चोख उत्तर दिले, ज्या धक्क्यातून विरोधक अजूनही सावरू शकलेले नाहीत.
महाराष्ट्राच्या विकासाचे खंबीर पाठीराखे
आमचे पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर चालतात. म्हणूनच त्यांच्या प्राधान्यक्रमात महाराष्ट्र नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी एका झटक्यात 3,500 कोटींची जमीन हस्तांतरित करणे असो किंवा राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना बळ देणे असो, महाराष्ट्राचा कोणताही प्रश्न मोदीजींनी कधीही प्रलंबित ठेवला नाही. या वर्षातच त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी 30 लाख नवीन घरांना मंजुरी दिली आहे.
आज केंद्र सरकारच्या पाठबळामुळे महाराष्ट्रात दहा लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर राहिला असून, यामध्ये केंद्र सरकारचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्याचे नवे विमानतळ, नागपूर आणि अमरावती विमानतळांचे आधुनिकीकरण, अमरावती टेक्स्टाइल पार्क, गडचिरोली स्टील सिटी, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, मुंबई, पुणे व नागपूर मेट्रोचे जाळे, छत्रपती संभाजीनगरमधील ’ऑरिक सिटी’, दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला मिळालेले विशेष पॅकेज आणि महत्त्वाकांक्षी ’नदीजोड प्रकल्प’ या प्रत्येक प्रकल्पाच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
मोदीजींना प्रत्यक्ष भेटण्याचे आणि त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळण्याचे भाग्य मला वारंवार लाभले आहे. ते आमच्या विशाल परिवाराचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेल्यास तत्काळ ठोस तोडगा मिळतो. पक्ष आणि सरकार या दोन गोष्टींची त्यांनी कधीही सरमिसळ केली नाही. पक्षाच्या विषयात सरकार आणि सरकारच्या कामात पक्ष, असा गोंधळ त्यांच्याकडे कधीही नसतो. बैठकांमध्येही विकासाचे मुद्दे आणि पक्षाचे विषय यांची स्पष्ट विभागणी असते.
सर्वाधिक काळ अखंड पंतप्रधान
गेल्या एका वर्षातील काळ हा तर भारताच्या राजकीय इतिहासात आणि जागतिक मुत्सद्देगिरीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. याच कालखंडात नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक काळ अखंड पंतप्रधानपदी राहण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे नोंदवून एक नवा इतिहास रचला. लोकशाहीच्या चौकटीत जनतेचा सलग आणि उत्तरोत्तर वाढणारा जनाधार कसा टिकवून ठेवता येतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण ठरले आहेत.
केवळ देशांतर्गत पातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचा दबदबा अभूतपूर्व उंचीवर पोहोचला आहे. नुकतीच भारतात पार पडलेली ’ब्रिक्स 2026’ शिखर परिषद भारताच्या यजमानपदाखाली अत्यंत यशस्वी ठरली. जागतिक शांतता, ग्लोबल साउथमधील देशांचे नेतृत्व, आंतरराष्ट्रीय व्यापारातील आर्थिक स्थैर्य आणि सामरिक भागीदारीच्या दृष्टीने या परिषदेत भारताने घेतलेली भूमिका जगाने मान्य केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकीर्दीतून देशातील जनतेला आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि विकासाची नवी दृष्टी दिली आहे. या महान राष्ट्रनेत्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देश अखंड प्रगतिपथावर पुढे जात राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Narendra Modi: A Resolute National Leader