प्रभाग सभापतींच्याच भागात गढूळ पाणी

महिलांत संताप; अनेक नागरिकांना जुलाब, उलट्या

सातपूर : प्रतिनिधी
एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना प्रभाग क्रमांक 10 मधील जाधव संकुलातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला गढूळ आणि उग्र वासाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रभाग सभापतींच्याच प्रभागात हा प्रकार सुरू असल्याने स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
गणेशोत्सवाच्या काळातच नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर हेच गढूळ पाणी अधिकार्‍यांना पाजू आणि त्याच पाण्याने त्यांना अंघोळ घालू, असा संतप्त इशारा महिलांनी दिला.
जाधव संकुल परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याला उग्र वास येत असून, नळातून गढूळ पाणी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप त्यावर ठोस उपाययोजना झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरातील काही नागरिक आणि चिमुकल्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले.
मथुराई सोसायटीतील माधुरी जाधव (26), रिद्धी कुशवाह (5), स्वप्नील निकम (15), साई गांगुर्डे (6), प्रतीक्षा पाटील (5) यांना उलट्या व जुलाबाचा त्रास होत असून, सविता आमजिरे यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्याचेही
सांगण्यात आले.
दरम्यान, सोसायटीतील ड्रेनेजचे सर्व चेंबर कोरडे असल्याचे दिसत असले तरी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन खोदून पाहणे पुरेसे नसून, ड्रेनेजची चेंबर आणि संपूर्ण जलवाहिनीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शोभा जाधव, मंगला चव्हाण, सुनीला कुशवाह, योगिता निकम, उमरवती पंडित, उर्मिला सोळंकी, कल्याणी गांगुर्डे, सुवर्णा पगार, सुमन हांडे, पद्मावती आव्हाड, सुलोचना पोटे, सुनीता पाटील, योगिता गिरासे यांच्यासह महिला व पुरुष नागरिक
उपस्थित होते.

दोन दिवसांत प्रश्न सुटला नाही तर हेच गढूळ मिश्रित पाणी अधिकार्‍यांना पाजणार आणि याच पाण्याने त्यांना अंघोळ घालणार.
– सुवर्णा पगार, नागरिक

सोसायटीतील ड्रेनेजचे सर्व चेंबर कोरडे आहेत. मात्र, ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या नळाला मिश्रित होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची लाइन खोदण्याबरोबरच ड्रेनेजचे चेंबरही तपासणे गरजेचे आहे.
– लखीचंद पाटील, नागरिक

गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांना याचे सोयरसुतक नसणे ही मोठी शोकांतिका आहे.
– मंगला चव्हाण, नागरिक

Turbid water in the Ward Chairperson’s own area.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *