पायवाट हरवलेले शहर : पादचार्‍यांचा अधिकार आणि वाढती बेपर्वाई

– वाहिद बागवान
प्रख्यात नगररचनाकार जेन जेकब्स यांनी एके ठिकाणी अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवून ठेवले आहे : एखाद्या शहराची रस्त्यांची रचना आणि तिथल्या पायवाटा जर माणसाला सुरक्षित वाटू देणार्‍या असतील, तर ते संपूर्ण शहरच सभ्य, सुरक्षित आणि जिवंत मानले जाते; पण जर तिथल्या रस्त्यांवर चालणार्‍या माणसालाच असुरक्षित वाटू लागले, तर कितीही आलिशान काँक्रीटची जंगले उभी राहिली तरी ते शहर आतून आजारी पडलेले असते. आज नाशिकच्या वेगाने विस्तारणार्‍या चौकाचौकांकडे आणि डांबरी रस्त्यांकडे पाहिले, की जेकब्स यांनी नाशिक डोळ्यापुढे ठेवूनच हे वाक्य उच्चारले की काय, असे वाटते. चकचकीत गुळगुळीत रस्ते, धावणार्‍या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या गाड्या आणि उंच इमारतींच्या झगमगाटात आपले लाडके नाशिक हळूहळू पायी चालणार्‍या माणसाला विसरत चालले आहे. आधुनिकतेच्या हव्यासापोटी या शहराने आपल्याच नागरिकांचा चालण्याचा मूलभूत नागरी अधिकार आणि संथ जगण्याचा आनंद अक्षरशः हिरावून घेतला आहे.
एकेकाळी नाशिकची खरी ओळख केवळ मंदिरांचे शहर म्हणून नव्हती, तर निवांतपणे रस्त्यांवरून भटकणार्‍या, जुन्या वाड्यांच्या थंडगार सावलीतून संथ पावले टाकत गोदाघाटावर पोहोचणार्‍या आणि एकमेकांना हाक मारत कट्ट्यांवर थांबणार्‍या सुसंस्कृत नागरिकांचे शहर अशी होती. कॉलेज रोडवर संध्याकाळी पडणारी गुलमोहराची फुले तुडवत मित्रमैत्रिणींसोबत मारलेला फेरफटका असो, किंवा मेनरोडच्या गजबजलेल्या बाजारपेठेत हातात पिशवी घेऊन कुटुंबासह केलेली निवांत खरेदी असो-नाशिकचा आत्मा हा इथल्या चालण्यात सामावलेला होता. आज मात्र घराचा उंबरठा ओलांडून रस्त्यावर दोन पावले चालणे म्हणजे अक्षरशः स्वतःचा जीव मुठीत धरून मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवण्यासारखे झाले आहे. पायवाटा आणि फूटपाथ तर नावालाच उरले आहेत; आणि जिथे ते चुकून शिल्लक आहेत, तिथे ते पायी चालणार्‍या माणसांसाठी नसून दुचाकींचे अनधिकृत पार्किंग, चहा-नाश्त्याच्या टपर्‍या, गॅरेजचे पसरलेले सामान, दुकानांचे मोठमोठे जाहिरात फलक आणि उघड्या चेंबरनी गिळंकृत केले आहेत.
शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी पादचार्‍यांच्या हक्काचा असा संकोच पदोपदी डोळ्यात भरतो. कॉलेज रोड आणि गंगापूर रोड यांसारख्या उच्चभ्रू मानल्या जाणार्‍या पट्ट्यात संध्याकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना किंवा लहान मुलांना घेऊन फेरफटका मारणे आता एक अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. पदपथांवर कॅफे आणि दुकानांसमोर लागलेल्या दुचाकींच्या रांगांमुळे सामान्य माणसाला नाईलाजाने मुख्य डांबरी रस्त्यावरून, अंगावरून जाणार्‍या भरधाव वाहनांच्या बाजूने चालावे लागते. जुन्या नाशिकमधील रविवार कारंजा, धुमाळ पॉईंट, दहीपूल ते मेनरोड या व्यापारी पेठांमध्ये तर पादचार्‍यांचा फूटपाथ कधीच नामशेष झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसणारे फेरीवाले, रस्त्यावर तीन-तीन फूट पुढे आलेले दुकानांचे ओटे आणि मध्यभागी अडकलेली दुचाकींची गर्दी यामुळे खरेदीसाठी आलेल्या कुटुंबांना एकमेकांना सावरत आणि वाहनांचे धक्के खात रस्ता शोधावा लागतो.
नाशिकरोडच्या जेलरोड आणि बिटको चौक परिसराचे चित्र पाहिले, तर हे संकट अधिक भीषण जाणवते. रेल्वे स्थानकाकडे जाणारी हजारो प्रवासी पावले ज्या मार्गावरून पडतात, तिथे पदपथांवर फेरीवाल्यांनी आणि अनधिकृत रिक्षाथांब्यांनी पूर्ण कब्जा केला आहे. मुंबई नाका आणि द्वारका चौक हे तर पादचार्‍यांसाठी अक्षरशः चक्रव्यूह बनले आहेत. महामार्गावरून शहरात प्रचंड वेगाने शिरणार्‍या अवजड कंटेनर्स आणि ट्रक्सच्या गर्दीत रस्ता ओलांडायचा कसा, हा विचार करताना सामान्य पादचार्‍याच्या काळजाचा ठोका चुकतो. शहरातील बहुतांश प्रमुख चौकांमध्ये पांढरे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पूर्ण पुसून गेले आहेत आणि जिथे ते चुकून दिसतात, तिथे चालणार्‍या माणसासाठी गाडीचा वेग कमी करण्याची किमान नागरी संवेदनशीलताही वाहनचालकांमध्ये राहिलेली नाही. रस्ते रुंद करण्याच्या प्रत्येक योजनेत सर्वांत पहिला बळी दिला जातो तो पादचार्‍यांच्या फूटपाथचा. उरलेल्या अरुंद जागेवर महावितरणचे डीपी बॉक्सेस किंवा ट्रॅफिक सिग्नलचे खांब उभे करून प्रशासनाने पायी चालणार्‍या माणसाची संपूर्ण नाकेबंदी करून टाकली आहे.
नगररचनाशास्त्रात ’वॉकॅबिलिटी’ म्हणजेच चालण्याची सुलभता हा कोणत्याही शहराच्या राहणीमान दर्जाचा सवार्ंत मोठा निकष मानला जातो. एखादे शहर तिथे धावणार्‍या गाड्यांच्या संख्येवरून कधीच महान ठरत नाही; तर त्या शहरातील सर्वात दुर्बल घटक- म्हणजे हाताला पिशवी धरून चालणारे वृद्ध आजोबा, पाठीवर दप्तर अडकवून चालणारी लहान मुलगी किंवा कडेवर बाळ घेतलेली आई-रस्त्यावरून किती सुरक्षित, शांत आणि स्वाभिमानाने चालते, यावरून त्या शहराचा सुसंस्कृतपणा मोजला जातो. लंडन, पॅरिस किंवा अगदी सिंगापूरसारख्या जागतिक महानगरांनी गेल्या काही दशकांत रस्ते वाहनांकडून परत काढून घेऊन ते चालणार्‍या माणसांच्या स्वाधीन केले आहेत. तिथे पदपथावर पाऊल ठेवताच गाड्या थांबतात आणि पादचार्‍याला पहिला मान दिला जातो. आपल्याकडे मात्र उड्डाणपूल आणि महामार्गांच्या नावाखाली चालणार्‍या माणसाला व्यवस्थेने पार हद्दपार करून टाकले.
यात केवळ प्रशासकीय अनास्थेला दोष देऊन चालणार नाही. एक नागरिक म्हणून आपली वाढती बेपर्वाई आणि संवेदनशून्यताही तितकीच जबाबदार आहे. घरापासून अवघ्या शंभर पावलांवरील दुकानातून दुधाची पिशवी आणायची असली, तरी गाडीची किक मारण्याची सवय आज नाशिककरांच्या अंगवळणी पडली आहे. पायी चालणार्‍या माणसाकडे तुच्छतेने किंवा ’गाडी नसलेला दुय्यम घटक’ म्हणून पाहण्याची विकृत मानसिकता समाजात खोलवर रुजत चालली आहे. पदपथावरून वाट न मिळाल्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या म्हातार्‍या माणसाच्या पाठीवर कर्णकर्कश हॉर्न वाजवणारा तरुण असो किंवा स्वतःच्या आलिशान बंगल्यासमोरचा फूटपाथ सिमेंटचा रॅम्प बांधून बंदिस्त करणारा घरमालक असो आपण सार्वजनिक पदपथांवर घातलेला हा सामूहिक दरोडा शहराचा सामाजिक श्वास गुदमरवून टाकत आहे.
सिंहस्थ 2027 च्या उंबरठ्यावर उभे असलेले नाशिक जेव्हा जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची, परिक्रमा मार्गांची आणि मेट्रो-निओची स्वप्ने पाहत आहे, तेव्हा या शहराने जमिनीवरच्या या विदारक वास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची नितांत गरज आहे. अब्जावधी रुपयांचे काँक्रीट शहराला गती नक्कीच देईल, पण जर कॉलेज रोडवर चालणार्‍या विद्यार्थ्याला, मेनरोडवर भाजी घेणार्‍या गृहिणीला किंवा गोदाघाटावर दर्शनाला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकाला सुरक्षित पायवाट नसेल, तर त्या कोट्यवधींच्या विकासाचा डोलारा पूर्णतः पोकळ ठरतो. प्रशासनाने शहरातील सर्व पदपथ हे अतिक्रमणमुक्त, सलग, सुरक्षित आणि अडथळामुक्त करण्याची मोहीम युद्धपातळीवर राबवली पाहिजे आणि शहरवासीयांनीही चालणे हा लाचारीचा नव्हे, तर आपल्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि नागरी अस्तित्वाचा स्वाभिमान आहे हे ओळखले पाहिजे. शहर हे केवळ वाहने पळवण्यासाठी नसते, तर चालणार्‍या माणसांच्या पावलांनीच शहराच्या मातीला माणसांचे शहर म्हणून जिवंतपण लाभत असते.

A City That Has Lost Its Footpaths: Pedestrians’ Rights and Growing Negligence

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *