शहरात गौरी-गणपती पूजन उत्साहात

वडाळागाव : प्रतिनिधी
शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठा गौरी-गणपती पूजनाचा सोहळा शुक्रवारी (दि.18) भक्तिमय वातावरणात झाला. विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गौरींची स्थापना करून आकर्षक सजावट, फुलांची आरास तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. महिला व कुटुंबीयांनी विधिवत पूजा-अर्चा करून सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. समर्थनगर, काठे गल्ली येथील व्यापारी दत्तू कुदळे यांच्या निवासस्थानीही ज्येष्ठा गौरी-गणपती पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. आकर्षक सजावट व पारंपरिक पद्धतीने मांडलेल्या गौरी-गणपतीच्या देखाव्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कुदळे कुटुंबीयांनी विधिवत पूजा-अर्चा करून नैवेद्य दाखविला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील भाविकांनी दर्शन घेऊन गौरी-गणपतीचे आशीर्वाद घेतले.

लाडाच्या गौराईंना आज निरोप
जाशील गौराई तू आपल्या घरी, जाताना घेऊन जा गं माहेराची शिदोरी, निरोप देऊ आज आनंदाने, ओटी भरून खणानारळाने, आई सेवा तुझी घे मानून समाधानाने..
तीन दिवस माहेरपणासाठी आलेल्या गौराई अर्थात महालक्ष्मींना आज निरोप देण्यात येणार आहे. अनेक घरांतील वर्षाचा महत्त्वाचा आणि मोठा सण महालक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी महालक्ष्मी पूजनानंतर आज (दि.19) सायंकाळी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. निरोपाच्या दिवशी आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. काल (दि.18) महालक्ष्मींना महानैवेद्य दाखविण्यात आला होता. यावेळी सोळा प्रकारच्या भाज्या, कोशिंबिरी, पुरणाचा नैवेद्य, पुरणाचे दिवे तांबूल, आंबिल कथिल तसेच विविध प्रकारचे फराळ, फळे नैवेद्यासाठी मांडण्यात आले होते. पुरणाचे दिवे, फराळाचे विविध प्रकार, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली होती. घरातील महिलांनी पारंपरिक साड्या नेसून नटूनथटून गौरी पूजन आणि हळदी-कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. गौराईनिमित्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांनी गर्दी केली होती.

Gauri-Ganpati Puja celebrated with enthusiasm in the city.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *