नाशिक : प्रतिनिधी
पाषाणयुगातील अग्नी आणि चाकाच्या शोधापासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्लाऊड तंत्रज्ञानापर्यंतचा मानवी प्रगतीचा प्रवास गणपती बाप्पांच्या साक्षीने उलगडणारी ‘ज्ञान एक्स्प्रेस’ डॅलस येथील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली आहे. नाशिकच्या असलेल्या वैशाली खैरनार- शिंपी यांनी अमेरिकेतील टेक्सास डॅलसमध्ये साकारलेल्या या देखाव्यातून भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम घडविला आहे.
गणपती बाप्पांच्या सुवर्ण सिंहासनाभोवती फिरणार्या ‘ज्ञान एक्स्प्रेस’मध्ये मानवी शोध आणि प्रगतीचे पाच टप्पे दाखविण्यात आले आहेत. पहिल्या स्थानकात गुहा, खडकाळ परिसर, वन्यजीवन आणि धबधब्याच्या माध्यमातून पाषाणयुग साकारले आहे. अग्नी आणि चाकाच्या शोधामुळे मानवी जीवनात झालेला बदल प्रभावीपणे दाखविण्यात आला आहे. दुसर्या स्थानकात वाफेची शक्ती, कारखाने, धुराडे, गिअर्स आणि रेल्वेच्या माध्यमातून औद्योगिक युग उभे केले आहे. तिसर्या स्थानकात विद्युत युगाचा भारतीय संदर्भ दाखविताना जुना दूरदर्शन संच, रेडिओ आणि दूरध्वनी यांचा वापर करण्यात आला आहे. चौथ्या स्थानकात जुना संगणक, की-बोर्ड, माऊस आणि फ्लॉपी डिस्कच्या माध्यमातून संगणक युगाची आठवण करून देण्यात आली आहे. संगणकाच्या पडद्यावर दिसणारे विंडोज 98 हे दृश्य विशेष लक्षवेधी आहे. शेवटच्या स्थानकात क्लाऊड, आयओटी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचे चित्रण केले आहे.
जुन्या पुठ्ठ्याचे खोके, की-बोर्ड, फ्लॉपी डिस्क, माऊस, कापूस, एलईडी दिवे आणि घरातील ई-कचर्याचा पुनर्वापर करून देखावा साकारण्यात आला आहे. ‘कमी वापरा, पुनर्वापर करा, नव्याने साकार करा’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा विचारही मांडण्यात आला आहे. देखावा अधिक संवादात्मक करण्यासाठी मोशन सेन्सरवर आधारित स्मार्ट घंटा बसविण्यात आली आहे. भक्त जवळ येताच मंगल घंटानाद होतो. शिंपी कुटुंबातील सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, रोहन शिंपीने गुहेवरील चित्रे रेखाटण्यासह विविध प्रतिकृती, रंगकाम आणि स्थानकांच्या उभारणीत योगदान दिले आहे. गेल्या वर्षी याच कुटुंबाच्या ‘समुद्र वाचवा’ या पर्यावरणपूरक देखाव्याला स्थानिक स्पर्धेत तृतीय पुरस्कार मिळाला होता.
Nashik family creates a unique Bappa display in the US.