बैठकीच्या आडून दादा भुसेंचा महाजनांना शह!

पालकमंत्री शहरात; दुष्काळाचा आढावा घेतला शिक्षणमंत्र्यांनी

नाशिक : प्रतिनिधी
पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेणे अपेक्षित असताना चक्क शिक्षणमंत्री असलेल्या दादा भुसे यांनी दुष्काळी आढावा घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक जे काम गिरीश महाजन यांचे आहे. ते भुसेंनी केल्यामुळे एकप्रकारे बैठकीच्या आडून दादा भुसेंनी महाजनांना शह दिल्याची चर्चा आहे.
शिक्षण विभागाचा कारभार दादा भुसे बघतात. त्यामुळे शिक्षण विभागाचा आढावा त्यांनी घेतला तर त्याची फारशी चर्चाही झाली नसती. परंतु जिल्ह्यतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणे हे खरे तर पालकमंत्र्यांचे काम. पण त्यांच्याऐवजी भुसेंनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाचा आढावा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचे कारण म्हणजे गेल्या आठवडाभरात शहरात घडलेल्या घडामोडी. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला भुसे उपस्थित असताना महाजन अनुपस्थित राहिले होते. तर 19 सप्टेंबर रोजी कुंभमेळा प्राधिकरणाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी राज्यातील अल्प पाऊस, पिकांची स्थिती आणि संभाव्य नुकसानीवर भाष्य केले होते. बाधित भागांतील पिकांचे पंचनामे करण्याबाबत त्यांनी माहिती दिली होती. तसेच धरणांतील उपलब्ध पाण्याचे पिण्यासाठी आणि पशुधनासाठी नियोजन करण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर सोमवारी (दि. 21) थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या स्वतंत्र बैठकीमुळे पालकमंत्री गिरीश महाजन विरुद्ध दादा भुसे अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
भुसे यांनी जिल्हाधिकारी, कृषी विभाग आणि पीकविमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत सविस्तर आढावा घेतला. तालुकानिहाय पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, संभाव्य नुकसान आणि पीक विम्याच्या कार्यवाहीची माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे भुसे यांनी
सांगितले. या सलग घडामोडींमुळे महाजन विरुद्ध भुसे या चर्चेला राजकीय वर्तुळात नवा संदर्भ मिळाला आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष मतभेद किंवा संघर्ष असल्याचे अधिकृतपणे समोर आलेले नसले तरी पालकमंत्री पदावरून सेना भाजपाभध्ये रंगलेला संघर्ष नाशिककरांनी पाहिलेला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला, तरी बैठकांच्या आडून एकमेकांना शह दिला जात तर नाही ना? अशी चर्चा रंगत आहे.

Dada Bhuse checkmates Mahajan under the guise of a meeting!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *