सिन्नरला दुष्काळी तालुका जाहीर करा : आमदार कोकाटेंची मागणी

42 दिवसांपर्यंत पावसाचा खंड; पिके करपण्याची भीती, तातडीने पंचनामा करून मदत देण्याची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतीपिके संकटात सापडली आहेत. अनेक मंडळांमध्ये तब्बल 42 दिवसांपर्यंत पावसाचा खंड नोंदविण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी मागणी आमदार तथा माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
आमदार कोकाटे यांनी 21 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन सिन्नरमधील पावसाच्या स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले. शासनाने नुकतेच काही तालुके पावसाच्या प्रमाणावर आधारित दुष्काळी तालुके म्हणून घोषित केले आहे. यात ट्रिगर वनमध्ये सिन्नरचा समावेश झालेला दिसत नाही. मात्र, 17 सप्टेंबरच्या ड्राय स्पेल अहवालानुसार सिन्नर तालुक्यातील एकूण 8 मंडळांमध्ये मोठ्या कालावधीचा कोरडा खंड नोंदविण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पत्रानुसार, शहा मंडळात 42 दिवस, सिन्नर मंडळात 40 दिवस आणि सोनांबे मंडळात 37 दिवसांचा कोरडा कालावधी नोंदविण्यात आला आहे. नांदूरशिंगोटे, डुबेरे व वावी प्रत्येकी 27 आणि गोंदे 25 दिवस असा खंड आहे. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांवरही पावसाच्या दडीचा परिणाम
जाणवत आहे.
सिन्नर तालुक्यातील पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि पावसातील दीर्घ खंड यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. टंचाईने ग्रासलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करावेत, अशी मागणीही कोकाटे यांनी केली आहे.

प्रचलित नियमानुसार नुकसानभरपाई द्या

शासनाच्या प्रचलित निकषांनुसार सिन्नर तालुक्याचा दुष्काळी/दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी स्पष्ट मागणी आमदार कोकाटे यांनी पत्रातून केली आहे. तसेच पात्र शेतकर्‍यांना शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असेही कोकाटे यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना सुचविले आहे.

Declare Sinnar a drought-hit taluka: MLA Kokate’s demand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *