17 ग्रॅमची चेन घेऊन दोघे पसार
सिन्नर : प्रतिनिधी
‘पुढे चोरी झाली आहे, आम्ही पोलीस आहोत,’ असे सांगत दोन भामट्यांनी 77 वर्षीय वृद्ध शेतकर्याला रस्त्यात अडवले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातचलाखीने काढून घेत दोघांनी पोबारा केला. नांदूरशिंगोटे येथील जुना पुणे रोडवरील नीलकमल फर्निचर मॉलसमोर 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
दोडी बुद्रुक येथील रंगनाथ गबाजी साबळे (77) हे मोटारसायकलवरून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. ‘पुढे चोरी झाली आहे,’ असे सांगून त्यांनी पोलिस असल्याची बतावणी केली. त्यानंतर साबळे यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हातचलाखीने काढून घेतली. या चेनची फिर्यादीत किंमत 45 हजार रुपये नमूद असून, सध्याच्या सोन्याच्या बाजारभावानुसार तिची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे.
एका संशयिताने आकाशी रंगाचा शर्ट, खाकी पॅन्ट, काळे बूट आणि काळे हेल्मेट घातले होते. त्याचे वय अंदाजे 30 वर्षे आहे. दुसर्या संशयिताने पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केली होती. त्याचे वय अंदाजे 21 वर्षे असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 अन्वये ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. अनोळखी व्यक्ती पोलिस असल्याचे सांगून रस्त्यात थांबवत असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Imposters posing as police dupe elderly farmer by claiming a theft had occurred ahead.