सेवा समितीचे कुंभमेळा आयुक्तांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
रामतीर्थावर गेल्या तीन वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दररोज अविरतपणे सुरू असलेल्या ’गोदावरी आरती’ उपक्रमाच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी 500 चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध करावी व ती बांधून देण्याची मागणी ’रामतीर्थ गोदावरी सेवा समिती’ने केली आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
रामतीर्थावर दररोज होणार्या गोदा आरतीचे महत्त्व आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात भर घालणार्या या उपक्रमाला आजवर राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांसारख्या देशातील सर्वोच्च आणि अतिमहत्त्वाच्या मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन गौरविले आहे. तसेच शेकडो गोदासेवक दररोज निःस्वार्थ भावनेने या सेवा कार्यात सहभागी होत आहेत.
अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेजवळ जागेची मागणी करण्यात आली. आरतीचे अवजड साहित्य दररोज लांबून वाहून आणणे आणि परत घेऊन जाणे सुरक्षेच्या दृष्टीने कठीण होते.
त्यामुळे सुव्यवस्थेसाठी अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेच्या शेजारी असलेली, आरतीच्या ठिकाणापासून सर्वांत जवळ असणारी महापालिकेच्या हद्दीतील 500 चौरस फूट मोकळी जागा समितीला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या उपक्रमाला लाभलेली राष्ट्रीय प्रतिष्ठा, सुरक्षा आणि दैनंदिन सुव्यवस्था विचारात घेऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे व 500 चौरस फूट मोकळी जागा समितीला वापरण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे आणि कोषाध्यक्ष अरिमा केला यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जागेचा ’या’ कारणांसाठी होणार वापर
साहित्य संरक्षण : आरतीचे दैनंदिन साहित्य, साउंड सिस्टिम आणि लाइट्स सुरक्षित ठेवण्यासाठी.
अतिथी व्यवस्थापन : देश-विदेशातून येणारे व्हीआयपी अतिथी व मान्यवरांच्या बैठकीसाठी.
चेंजिंग रूम सुविधा : आरती उपक्रमात सहभागी होणार्या मुला-मुलींना वेशभूषा बदलण्यासाठी (वस्त्रांतरण) स्वतंत्र आणि सुरक्षित जागा.
प्रसाधनगृह : भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरते शौचालय उभारण्यासाठी.
Demand for 500 square feet of space for Goda Aarti management.