म्हसरूळमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

चौघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

पंचवटी : प्रतिनिधी
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवर एका वीसवर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची गंभीर घटना 20 सप्टेंबर रोजी रात्री घडली. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत पवार या संशयित आरोपीला अटक केली आहे.
पेठ रोडवरील अश्वमेधनगर येथे राहणारा तुषार दीपक इंगळे (वय 20) हा 20 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास दिंडोरी रोडवरील मधुर स्वीट व रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ आपला भाऊ सिद्धेश याच्यासोबत उभा होता. यावेळी तुषार हा आपल्या मित्राला पैसे देत असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याचदरम्यान आर्यन मोगरे, साई कुटे आणि अन्य दोन साथीदार तेथे आले. त्यांच्यात कोणत्या कारणावरून वाद सुरू झाला. याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. वाद वाढल्यानंतर संशयितांनी तुषारवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात तुषारच्या डोक्यावर तसेच उजव्या हातावर वार झाले. गंभीर जखमी झाल्याने तो घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, अमोल मस्के व त्यांच्या सहकार्‍यांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू केला. पोलिसांनी उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील अनिकेत पवार याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी संशयितांचा सहभाग असल्याने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी हल्ला झालेल्या घटनास्थळी नेले. तेथे पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला पायी फिरविण्यात आले. परिसरात घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई ठोस असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कारवाईतून करण्यात आला.
या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

Youth attacked with a sharp weapon in a life-threatening assault in Mhasrul.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *