नियमित आयकर विवरणपत्र ठरले कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेचा आधार

अपघातग्रस्त चालकाच्या कुटुंबाला 68 लाखांची भरपाई

नाशिक : नियमितपणे आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणे हे केवळ करप्रक्रियेपुरते मर्यादित नसून भविष्यात कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता, बँक कर्ज तसेच अपघाती मृत्यूच्या प्रकरणातील नुकसानभरपाईसाठीही महत्त्वाचे ठरू शकते, याची प्रचिती नाशिकमध्ये आलेल्या एका प्रकरणातून आली आहे.
कलंत्री ट्रान्स्पोर्ट प्रा. लि., नाशिक येथे कार्यरत असलेल्या मंजे या चालकाचा सुमारे दीड वर्षापूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. कंपनीकडून त्यांना मिळणारे वेतन तसेच प्रत्येक ट्रिपचा इन्सेन्टिव्ह नियमितपणे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते. त्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाची अधिकृत नोंद उपलब्ध होती. कंपनीकडून मंजे यांना नियमितपणे आयकर विवरणपत्र भरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते.
त्यानुसार त्यांनी सलग दोन वर्षांचे विवरणपत्र भरले होते. अपघातानंतर त्यांच्या कुटुंबासाठी नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात आला. या प्रकरणात त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत बँक रेकॉर्ड तसेच दाखल केलेले आयटीआर महत्त्वाचे दस्तऐवज ठरले.
12 सप्टेंबर 2026 रोजी नाशिक येथील लोकअदालतीत झालेल्या समझोत्याद्वारे त्यांच्या कुटुंबासाठी 68 लाखांच्या नुकसानभरपाईचा दावा निकाली काढण्यात आला.
यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जैन यांच्या उपस्थितीत समझोता झाला असल्याचे सांगण्यात आले. ही नुकसानभरपाई मंजे यांच्या मातोश्री इंद्रावती देवी, पत्नी संजुदेवी तसेच मुले साक्षी, रिया आणि अनिस यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम कुटुंबाला प्राप्त होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणात कलंत्री ट्रान्स्पोर्ट प्रा. लि.ने मंजे यांच्या कुटुंबाला आवश्यक सहकार्य केले. कुटुंबाला योग्य मदत आणि न्याय मिळावा यासाठी अ‍ॅड. सुराणा तसेच नाशिक न्यायालयातील संबंधित प्रक्रियेत कंपनीकडून सातत्याने सहकार्य करण्यात आले.
चालक बांधवांना आयटीआर भरण्याचे आवाहन
या घटनेच्या पाश्वर्र्भूमीवर कलंत्री ट्रान्स्पोर्ट प्रा. लि.ने सर्व चालक बांधवांना दरवर्षी नियमितपणे आयटीआर दाखल करण्याचे आवाहन केले आहे. अनेकदा माहितीअभावी किंवा आयकर भरावा लागेल या भीतीने चालक आयटीआर दाखल करण्याकडे दुर्लक्ष करतात.
मात्र, कर देय नसला तरी पात्र व्यक्तींनी आपले उत्पन्न योग्य पद्धतीने नोंदवून आयटीआर दाखल केल्यास भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो.
नियमित आयटीआर आणि उत्पन्नाची अधिकृत नोंद बँक कर्ज, आर्थिक व्यवहारांची नोंद तसेच अपघाती नुकसानभरपाईच्या प्रकरणांमध्ये उत्पन्न सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे चालक बांधवांनी आपल्या उत्पन्नाचे योग्य रेकॉर्ड ठेवावे आणि आवश्यकतेनुसार पात्र करसल्लागार किंवा सीए यांचा सल्ला घेऊन दरवर्षी आयटीआर दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज कदाचित या कागदपत्रांची गरज जाणवणार नाही. मात्र, भविष्यात अनपेक्षित परिस्थितीत हेच उत्पन्नाचे अधिकृत रेकॉर्ड कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे ठरू शकते, असा संदेश कंपनीकडून देण्यात आला आहे.
आयटीआर भरण्यासाठी किंवा त्यासंदर्भातील मार्गदर्शनासाठी कलंत्री ट्रान्स्पोर्ट प्रा. लि.कडून चालक बांधवांना आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

Regular income tax filing proved to be the foundation of the family’s financial security.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *