शेतकर्यांमध्ये चर्चा; निफाड परिसरातील सद्यस्थितीचा आढावा
निफाड : आनंद जाधव
यंदा कांदा काढणीवेळी पावसाने लावलेली हजेरी आणि त्यानंतर झालेली अतिउष्णता यामुळे निफाडसह नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र, असे असतानाही आणि बाजारात कांद्याची अत्यल्प आवक होत असतानाही अपेक्षेप्रमाणे बाजारभावात सुधारणा होत नसल्याने “कांदा घटला तरी बाजारभाव का वाढला नाही?” अशी चर्चा शेतकरीवर्गात
सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने निफाड तालुक्यात उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. हा कांदा साठवून गरज भासेल तसा विकता येतो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हे पीक जुगार ठरू लागले आहे. यावर्षी काढणीच्या वेळी पाऊस आणि मे महिन्यात विक्रमी उष्णतेमुळे शेतातील उन्हाळ कांदा सडला तरीही पुढे चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकर्यांनी तो चाळीत साठवला. मात्र, खराब वातावरणामुळे हा कांदा चाळीत फार काळ टिकला नाही.
बाजारभाव अन् प्रतवारी
सध्या लासलगाव आणि पिंपळगाव बाजारात कांद्याला 1000 ते 5100, तर सरासरी 4000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. सोलापूर बाजारात हाच भाव 6000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या मते, सध्या बाजारात येणार्या कांद्याची प्रतवारी घसरली आहे. जो उत्तम प्रतीचा कांदा 5000 ते 5500 रुपये भावाने विकला जात आहे, तो प्रामुख्याने बियाणे तयार करण्यासाठी वापरला जात आहे. अनेक शेतकर्यांनी उत्तम प्रतीचा कांदा अजूनही चाळींमध्येच राखून ठेवला आहे.
No improvement in prices despite a drop in onion arrivals.