शासनाला अहवाल सादर केला जाणार
नाशिक : प्रतिनिधी
शहरात ऐन गणेशोत्सव काळात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश आजारापाठोपाठ आता स्वाइन फ्लूचा उद्रेक पहायला मिळत आहे.स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत अकरा बळींची नोंद झाल्यानंतर डेंग्यूनेही वर डोके काढले आहे. 50 रुग्ण या आजाराने बाधित असून, नुकत्याच एका चारवर्षीय बालिकेचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयात जाऊन याबाबत सखोल माहिती घेतली जात असल्याचे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.
मंगळवारी (दि.22) पाथर्डी फाटा येथील विपश्यना मिलिंद बनसोडे या चारवर्षीय चिमुकलीचा डेंग्यूसदृ्श आजाराने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बालिकेचा डेंग्यूने मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयाने केलेल्या तपासणी अहवालात संबंधित मुलीचे यकृत निकामी झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.त्यामुळे सदर मुलीच्या मृत्यूच्या कारणांची तपासणी करून तपासणी अहवाल हा शासनाच्या समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्यामुळे या तपासणी अहवालाकडे आता लक्ष लागून आहे. मुलीवर योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या पथकाने संबंधित रुग्णालयात जाऊन मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. उपचारासंदर्भातील कागदपत्रे आणि तपासणी अहवाल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच बालिका वास्तव्यास असलेल्या परिसरात धूरफवारणी तसेच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
उपाययोजना तोकड्या?
शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून स्वाइन फ्लू व डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शहरात रुग्णांची संख्या वाढतच असल्याने वैद्यकीय विभागाच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने केला जातो आहे.
Municipal Corporation to probe girl’s dengue-like death.