शेतात दुष्काळ; चांदवडचा ‘ट्रिगर-1’मध्ये समावेशाची मागणी
चांदवड : वार्ताहर
डोळ्यांसमोर पिके करपलेली असताना शासनाच्या दुष्काळ मूल्यमापनातील ‘ट्रिगर-1’ यादीत चांदवड तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकर्यांचा संताप सोमवारी (दि.28 ) तहसील कार्यालयावर धडकला. शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी करपलेल्या पिकांचे अवशेष प्रशासनाकडे सुपूर्द करून शेतकर्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने गाजर वाटप करून निर्णयाचा निषेध करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, पुढील हंगामाचीही चिंता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चांदवडचा दुष्काळी यादीत समावेश होईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, शासनाने जाहीर केलेल्या ‘ट्रिगर-1’ यादीत तालुक्याचे नाव नसल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. गेल्या आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, त्यानंतर जाहीर झालेल्या यादीत चांदवड वगळण्यात आल्याने शेतकर्यांनी थेट तहसील कार्यालय गाठत शासनाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनीही तहसील कार्यालयात स्वतंत्र निवेदन सादर केले. त्यामुळे चांदवडच्या दुष्काळी प्रश्नावर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून प्रशासनाकडे मागणी करण्यात आल्याचे चित्र दिसले. यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, संचालक डॉ. आत्माराम कुंभार्डे, संजय जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख विलास भवर, समाधान जामदार, काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोके, अॅड. नवनाथ आहेर, पुंडलिक गुंजाळ, अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, अॅड. भरत ठाकरे, अॅड. विनायक घुले, अॅड. अन्वर पठाण, अॅड. गोरख पवार, सीपीएम तालुकाध्यक्ष हनुमंत गुंजाळ, विजय जाधव, संयुक्ता बनकर, रोशन पवार, केशव ठाकरे, समाधान आहेर, साहेबराव चव्हाण, ज्ञानेश्वर आवारे, सौरभ देशमाने, शंभू खैरे, मनसेचे नाना विसपुते, नितीन थोरे, वैशाली सोनवणे, परवेज पठाण, पंकज गोसावी, ज्ञानेश्वर गाढे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष केदारे, प्रवीण वानखेडे आदी उपस्थित होते.
‘वगळण्याचा आधार काय?’
मोर्चादरम्यान प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, शेतातील पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती गंभीर असताना चांदवडचा दुष्काळी यादीत समावेश का करण्यात आला नाही, असा सवाल करण्यात आला. दुष्काळाचे निकष लागू करताना तालुक्यातील वस्तुस्थितीचा फेरआढावा घ्यावा, निकषांची पुन्हा तपासणी करावी आणि चांदवडचा तातडीने ‘ट्रिगर-1’मध्ये समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली. शेतकर्यांनी आणलेले करपलेल्या पिकांचे अवशेष यावेळी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. कागदावरील निकषांपेक्षा शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. शासनाच्या निर्णयामुळे दुष्काळी उपाययोजनांपासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी तातडीने फेरआढावा घेण्याची मागणी करण्यात आली.
Farmers’ protest march with withered crops