सिन्नर : प्रतिनिधी
पहाटेच्या वेळी सूर्य उगवला… पूर्व दिशेने आलेली सूर्यकिरणांची सोनेरी प्रभा नंदी मंडपातून थेट गोंदेश्वरच्या गाभार्यात पोहोचली… आणि काही क्षणांतच ती शिवलिंगावर स्थिरावली. सिन्नरच्या ऐतिहासिक श्री गोंदेश्वर महादेव मंदिरात मंगळवारी (दि. 29) निसर्ग आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. शिवलिंगावर पडलेल्या सूर्यकिरणांनी जणू सूर्यनारायणानेच महादेवाला अभिषेक केल्याचा भाविकांना अनुभव आला.
दरवर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्याच्या अखेरीस गोंदेश्वर मंदिरात सूर्योदयाच्या वेळी हा नैसर्गिक किरणोत्सव पाहायला मिळतो. यंदा रविवारपासून सुरू झालेला हा किरणोत्सव शुक्रवारपर्यंत अनुभवता येणार आहे. मंदिराचे अभ्यासक व निरीक्षक दत्ता शेळके यांनी ही माहिती दिली.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून दत्ता शेळके या किरणोत्सवाचे सातत्याने निरीक्षण करीत आहेत. त्यांच्या निरीक्षणातून गोंदेश्वरचा हा वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव भाविक आणि अभ्यासकांच्या लक्षात आला. वर्षभर शिवपूजा व अभिषेक करणारे सतीश सूर्यवंशी, रवी कोठुरकर, नितीन हटकर आणि भगवान यांचे सहकार्य लाभत असल्याचे शेळके यांनी सांगितले.
स्थापत्यकलेची अचूक ‘किमया’
सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडून येणारी किरणे नंदी मंडपातून विशिष्ट दिशेने प्रवास करीत गाभार्यात दाखल होतात. त्यानंतर ती थेट शिवलिंगावर पडतात. कोणत्याही कृत्रिम साधनाशिवाय घडणार्या या नैसर्गिक घटनेमुळे गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्यरचनेचे वैशिष्ट्य पुन्हा अधोरेखित होते.
मार्च, सप्टेंबरमध्ये सूर्यकिरणांचा ‘अभिषेक’
गोंदेश्वर मंदिरात वर्षातून दोनदा-मार्च आणि सप्टेंबरच्या अखेरीस-सूर्यकिरणे विशिष्ट पद्धतीने शिवलिंगावर पडतात. कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील सूर्यकिरणोत्सवाप्रमाणेच सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील हा सोहळाही निसर्ग, श्रद्धा आणि स्थापत्यवैभवाचा अनोखा संगम ठरत आहे.
‘Kiranabhishek’ (Sun-ray Anointment) on the Shivling in the sanctum sanctorum of Gondeshwar.