सुटका…

– वासवदत्ता अग्निहोत्री

वयाच्या नव्वदाव्या वर्षी, हातापायाची हालचाल खूपच संपुष्टात आली आहे, देह बर्‍याच विकारांनी पिडला आहे, जगण्यासाठी मुबलक सुबत्ता असूनदेखील मन, आत्मा ह्या देहाच्या तिजोरीतून मुक्त होण्यास तडफड करतो….आयुष्यात माणसाला अनेकवार हवीहवीशी वाटते…सुटका.अतिशय असाध्य रोगाने त्रासलेला रुग्ण देखील ’मर्सी डेथ ’ म्हणजेच दया मृत्यू मागतो. कारण रोग बरा होण्याची शक्यताच नसते आणि देह तरी किती भोगणार!ही इच्छा मृत्यू ची परवानगी, सरकारकडून घेण्यात येते. सुटका हा शब्द आपल्या दैनंदिन व्यवहारात बर्‍याच वेळेस वापरतो. संस्कृतमध्ये ’सूट’ किंवा सुटणे हे क्रियापद ’स्फुट ’किंवा स्फुट्यत अर्थात, फुटणे या संकल्पनेशी संबधित आहे. प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधे स्फुटितचे रूपांतर ’छुट्ट ’ किंवा ’सुट्ट’मध्ये झाले.सूट शब्दाला आ प्रत्यय लागून याचा भाववाचक शब्द सुटका तयार झाला. याचा अर्थ सोडवणूक किंवा सोडणे असा होतो. हा शब्द मराठी भाषेइतकाच जुना आहे. म्हणजेच किमान 800 ते 1000 वर्षे जुना आहे. ऐतिहासिकसंदर्भात ’आग्र्याहून सुटका’ हा शिवरायांचा पराक्रम सर्वांनाच माहीत आहे.
जिथे बंधन आहे तिथेच सुटकेची अपेक्षा असते. दोन परस्परविरोधी शब्द कितीक विरोधी असले तरीदेखील एकमेकांस पूरक असतात. एकाशिवाय दुसर्‍याला अर्थच येत नाही. जसे रात्र काय आहे हे पाहिले की दिवस काय असतो, हे कळते. सुटका ही बंधनाशी निगडित आहे. पिंजर्‍यातून पक्ष्यांची सुटका झाल्यानंतर त्याच्या किलबिलाटात ही वेगळाच आनंद आढळतो. हिंस्र जीवांपासून आपण स्वतचे रक्षण करण्यास त्यांना मर्यादित ठेवतो, पण पिंजरा त्यांनाही आवडत नसतो कारण तो कुणालाच आवडत नाही. स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच प्रिय असते. आजकाल जेव्हापासून वनं, जंगलं वाचवण्याची
मोहीम सुरू झाली आहे आणि हिंस्र पशूच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे तेव्हा, रुग्ण पशूंना, बेशुद्ध करून त्यांचा उपचार करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात येते, तेव्हा सुटकेची त्यांची धडपड पाहून आणि सुटका झाल्यावर त्यांचा आनंद द्विगुणित झालेला पाहून किती छान वाटते. पक्षी पिंजर्‍यात असताना सुरेख वाटतात की आकाशात उंच भरारी मारताना, हे आपण चांगलेच जाणतो. आजकाल मेडिकल क्षेत्रात, टेक्निक खूप पुढे गेले आहे, पण यापूर्वी गावखेड्यातून, लहान शहरातदेखील बाळंतिणीची ’सुटका’ करण्यास सुईण बोलावत होते. तिच्या हातात, बाळ-बाळंतीण सुखरूप ठेवण्याचे कसब होते. तिच्यावर सर्वांचाच विश्वास असायचा. आत्तासारखे पूर्वी मूल जन्माला घालण्याचे ऑपरेशन होत नव्हते आणि बाळंतीण ही सव्वा महिन्यात अगदी टुणटुणीत होत होती. हे सुखरूप सुटका झाल्यानंतर संभवत होते. अपराध्याला, तुरुंगवास भोगल्यावर जेव्हा त्याची सुटका होते तेव्हा काय वाटत असेल? नक्कीच त्याचे मन विभागले जात असेल. अनेक शंका-कुशंका त्याचा मनात थैमान घालत असतील. ’मला आता पूर्वीसारखा मान मिळणार नाही, कुणी नोकरीवर ठेवेल की नाही? घरच्या लोकांची वागणूक कशी होणार? मित्र मंडळी उभे करतील की नाही? समाजात आता आपले स्थान कुठे असणार?’…नाना शंका त्याला पोखरत असतात. खरंतर त्याला तुरुंगातून सुटका मिळाली असते, पण त्याचे मन कितीक बंदिस्त असते. फाशीची शिक्षा म्हणजे भयानक अपराध्याची सुटकाच नाही काय! हे बंदिस्त असणे, सुटकेला जास्त मोठे करते. बंधन जितके कडक तितकीच सुटका सुखद. पूर्वीपासून घरात, वयात येणार्‍या मुलींना, बंधनात ठेवण्याची परंपरा आहे. मुलींना त्यांचे भलेबुरे जरी कळत असेल तरी त्याच्या बाबतीत एक विशिष्ट भीती, पालकांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पूर्वी बालविवाह, याच कारणास्तव होत होते. आता मात्र स्थितीत खूप जास्त परिवर्तन घडले आहे. वयाच्या पस्तिसाव्या वर्षीसुद्धा मुली लग्नासाठी धजावत नाहीत कारण बंधन. त्यांना बंदिस्त होणे नको असते, पण मग पुढे काय? याचा विचार फक्त पालक करतात आणि दुःखी होतात. त्यांना आपल्या जबाबदारीतून सुटका हवी असते, पण मुली त्यांना सुटका मिळूच देत नाहीत. आज कुठलीही विवाह जुळवणारी संस्था बघा, त्यात मुलांची संख्या जास्त आढळेल. आधीच्या काळात, मुला- मुलींना किती सूट द्यायची, हे पालक ठरवत होते, पण आज अपत्यांना किती सूट हवी हे तेच ठरवतात आणि तशी सूट घेतात. ज्यांना सूट मिळत नाही ते विद्रोही होतात आणि ओरबाडून हवे ते हस्तगत करतात.

Release…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *